जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | मुख्य-संपादक : संतोष लांडे /किरण सोनवणे.
नागपूर : दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे 68 व्या धम्मचक्र प्रर्वतनदिन कार्यक्रमाच्या निमित्ताने येणाऱ्या अनुयायींच्या योग्य सुरक्षा, आरोग्य व इतर सेवांबाबत सर्व यंत्रणांनी एकमेकांच्या सहकार्याने जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. वैद्यकीय पथक, सुरक्षा पथक, स्वच्छता पथक, वाहतूक व्यवस्था, अतिरिक्त निवास व्यवस्था या ठिकाणी ज्या अधिकारी, कर्मचारी वर्गावर जबाबदारी देण्यात आली आहे त्यांनी अधिक काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या.
दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे 68 व्या धम्मचक्र प्रर्वतनदिन कार्यक्रमाच्या पूर्व तयारी बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस परिमंडळ-1 चे पोलीस उपायुक्त लोहित मतानी, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे प्रतिनिधी सुधीर फुलझेले, विलास गजघाटे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, मनपा उपायुक्त मिलींद मेश्राम व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नागपूर रेल्वे स्टेशन येथून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या व वेळा याच बरोबर ज्या प्लॉटफार्मवरुन या गाड्या नागपूर येथून रवाना होणार आहेत. त्याबाबत वेळोवेळी दीक्षाभूमी येथे येणाऱ्या अनुयायींना माहिती अवगत होणे आवश्यक आहे. नागपुरात येता वेळेस अजनी चौक येथे सर्व जण उतरतात. यात प्रवाशांची कोणतीही गैरसोय होणार नाही यादृष्टीने नियोजनासाठी शासकीय यंत्रणेसमवेत समता दल सैनिक, स्मारक समितीचे सदस्य मिळून काम करतील, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.
या कालावधीत विविध संस्थांमार्फत अनेक सेवाभावी उपक्रम राबविले जातात. यात रक्तदानासारख्या महत्वाच्या शिबीरासाठी ज्या संस्था पुढाकार घेतील त्यांना जिल्हा प्रशासन ब्लड बँक समवेत समन्वय साधून देऊ असे त्यांनी स्पष्ट केले.
