संघर्षातून अभिनयाची ओळख निर्माण करणारा अभिनेता – पारस फुले.
प्रतिनिधी -सारंग महाजन.
विदर्भ नागपूर येथील अभिनेता पारस यांनी नाट्यकलेपासून मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजपर्यंतचा प्रवास सुप्रसिद्ध अभिनेता अमित फाटक आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री पद्मश्री पुरस्कार प्राप्त नयना आपटे यांच्या मार्गदर्शनातून अभिनयाला नवी दिशा मिळाली
कलाक्षेत्र हे दिसायला जितके आकर्षक आहे, तितकाच या क्षेत्रातील प्रवास संघर्षमय आहे. या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी सातत्य, मेहनत, जिद्द, संयम आणि अभिनयाप्रती प्रामाणिकपणा असणे आवश्यक असते. मुख्य म्हणजे आई-वडिलांच्या आशीर्वादा सोबत स्वामींचा आशीर्वाद आणि साथ या प्रवासात महत्त्वाची आहे. अशाच जिद्दीच्या जोरावर अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे नाव म्हणजे अभिनेता पारस फुले.
गेल्या अनेक वर्षांपासून पारस फुले हे नाट्यकलेशी जोडलेले असून, जवळपास १२ वर्षांच्या रंगभूमीवरील अनुभवातून त्यांनी आपल्या अभिनयप्रवासाची जडणघडण केली आहे. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी, संधींसाठी करावी लागणारी धडपड, ऑडिशन्स, नकार आणि स्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान अशा अनेक टप्प्यांतून त्यांना जावे लागले.
एका चांगल्या संधीसाठी त्यांचा आताही संघर्ष सुरूच आहे.मात्र, कोणत्याही परिस्थितीत हार न मानता अभिनयाची आवड आणि कलेवरील प्रेम कायम ठेवत त्यांनी आपला प्रवास सुरू ठेवला.
अभिनेता पारस यांनी रंगभूमीवर काम करताना अभिनयातील बारकावे, संवादफेक, देहबोली, चेहऱ्यावरील हावभाव आणि पात्र समजून घेण्याची कला त्यांनी आत्मसात केली. याच अनुभवाच्या बळावर त्यांनी मराठी आणि हिंदी मालिका, चित्रपट, लघुपट, वेबसीरिज तसेच जाहिरात आणि प्रमोशनल व्हिडिओ अशा विविध माध्यमांमध्ये काम करण्याची संधी मिळवली.या प्रवासात त्यांना सुप्रसिद्ध अभिनेता श्री. अमित फाटक आणि ज्येष्ठ अभिनेत्री पद्मश्री पुरस्कार प्राप्त सौ. नयना आपटे यांचे मार्गदर्शन आणि साथ लाभले. अभिनयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, पात्राची समज, कामातील शिस्त आणि कलाकार म्हणून स्वतःला घडवण्याच्या प्रक्रियेत या मार्गदर्शनाचा त्यांना निश्चितच फायदा झाला. अनुभवी कलाकारांकडून मिळणारे मार्गदर्शन हे नव्या कलाकारासाठी मोठी प्रेरणा असते. पारस फुले यांच्यासाठीही हे मार्गदर्शन त्यांच्या कलाप्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरले आहे.विशेष म्हणजे, पारस फुले यांना २०२६ मध्ये ‘राजा शिवछत्रपती’ या नाटकामध्ये ‘फतेह खान’ च्या भूमिकेसाठी ‘बेस्ट अॅक्टर अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांच्या अभिनयप्रवासातील महत्त्वाचा गौरव असून, भविष्यात आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा देणारा आहे.
स्टार प्रवाह, झी मराठी आणि कलर्स मराठी यांसारख्या लोकप्रिय वाहिन्यांवरील मालिकांमध्ये त्यांनी विविध छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. ‘तुझ्याकडे तुला मागणे’, ‘कमळी’, ‘लक्ष्मी निवास’, ठरलं तर मग’ , ‘मोहिनी’, ‘विसरू नको तू मला’, ‘तुही रे माझा मितवा’, ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘आनंदी’, ‘वीण दोघातली ही तुटेना’, ‘जय जय स्वामी समर्थ’, यूट्यूब वरील ‘प्रचिती सद्गुरू श्री गजाननाची’ यांसारख्या मालिकांमध्येही त्यांनी काम केले आहे.
प्रत्येक भूमिका छोटी असो किंवा मोठी, त्या पात्राला न्याय देण्याचा प्रयत्न करणे हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे.मालिकांबरोबरच चित्रपट, लघुपट, वेबसीरिज आणि जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. विविध प्रकारच्या भूमिका साकारताना स्वतःमध्ये नवनवीन बदल घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. एका कलाकाराने केवळ एका प्रकारच्या भूमिकेपुरते मर्यादित न राहता वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारण्याची तयारी ठेवली पाहिजे, असा त्यांचा दृष्टिकोन आहे.
पारस फुले यांचा प्रवास हा केवळ अभिनयाच्या संधी मिळवण्यापुरता मर्यादित नाही, तर रंगभूमीशी असलेली नाळ जपत स्वतःची कलात्मक ओळख निर्माण करण्याचा आहे. अभिनयासोबतच नाट्यकलेच्या प्रसारासाठी आणि नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठीही ते प्रयत्नशील आहेत. ‘स्वामी कला मंदिर’ या प्रोडक्शन हाऊस च्या माध्यमातून नाट्यकला, अभिनय प्रशिक्षण आणि सांस्कृतिक उपक्रमांशी जोडलेले काम करण्याची त्यांची धडपड सुरू आहे.संघर्ष, जिद्द, मेहनत, अभिनयावरील निष्ठा आणि स्वामींची त्यांच्यावर असलेली कृपा आणि आशीर्वाद यांच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे अभिनेता पारस फुले यांचा हा प्रवास अनेक नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. भविष्यातही विविध भूमिका आणि उत्तम कलाकृतींच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न आहे.
— अभिनेता पारस फुले यांच्या कलाप्रवासाचा विशेष परिचय







