मुंबई पोलीस दलाला हादरवून सोडणारी आणि खाकी वर्दीला डाग लावणारी एक अत्यंत मोठी घटना समोर आली आहे! बोरीवली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक (PSI) ज्ञानेश्वर पराडे याला चक्क १ लाख ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पोलीस ठाण्यातच रंगेहात पकडले आहे!
अटक न करण्यासाठी मागितली १.५ लाखांची लाच!
मिळालेल्या माहितीनुसार, एका ६५ वर्षीय तक्रारदारावर आणि त्यांच्या दोन बहिणींवर दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पीएसआय पराडे याने सुरुवातीला १ लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर १ लाख ३० हजार रुपये ठरले. तक्रारदाराने याबाबत मुंबई एसीबीकडे तक्रार नोंदवली.
पोलीस ठाण्यातच रचला सापळा अन् रंगेहात पकडले!
३० सप्टेंबर रोजी पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केल्यानंतर ५ ऑक्टोबर रोजी एसीबीने थेट बोरीवली पोलीस ठाण्यातच सापळा रचला. तक्रारदाराकडून १ लाख ३० हजार रुपयांची रोकड स्वीकारताच एसीबीच्या पथकाने पराडेला बेड्या ठोकल्या. त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याच्या घराचीही झडती घेण्यात आली आहे.







