कासोद्यात कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न; पतीला अटक
उप संपादक | प्रणित काठोके
कासोदा, ता. एरंडोल : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला मानसिक त्रास देत कापडी उपरण्याने गळ्याला फास लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना कासोदा गावात घडली. या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पती निलेश भगवान पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १२ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजता कासोदा येथील राहत्या घरात घडली. फिर्यादी पत्नी आणि त्यांचे पती निलेश भगवान पाटील हे घरातील बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपीने पत्नीच्या शिक्षणावरून तसेच ती कमाई करत नसल्याच्या कारणावरून टोमणे मारत मानसिक त्रास दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
दरम्यान, आरोपीने आपल्या मामाच्या मुलीशी लग्न केले असते तर मोठ्या प्रमाणात पैसे मिळाले असते, तसेच पत्नी घरात बसून फुकट खात असल्याचे बोलून तिला त्रास दिल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे फिर्यादी रडू लागल्यानंतर आरोपीने डोळे पुसण्याच्या बहाण्याने पांढऱ्या रंगाच्या कापडी उपरण्याने तिच्या गळ्याला फास लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेनंतर फिर्यादीवर हिरे मेडिकल कॉलेज, धुळे येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान प्राप्त झालेल्या जबाबाच्या कागदपत्रांच्या आधारे १६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.०९ वाजता कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी CCTNS गु.र.नं. १२३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १०९(१) आणि ८५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी निलेश भगवान पाटील याला अटक केली असून पुढील तपास कासोदा पोलीस करीत आहेत.








