पालकमंत्री महोदय, केवळ ‘झेंडावंदन’ आणि ‘DPC’ पुरतेच धाराशिव आठवते का? – ॲड. संजय भोरे
कोलमडलेल्या शिक्षण व बस व्यवस्थेवरून युवासेना जिल्हा समन्वयक ॲड संजय भोरे यांचा जळजळीत सवाल!
उद्या, १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यासाठी व त्यानंतर डीपीसी (DPC) बैठकीत नियोजनाचे केवळ कागदी घोडे नाचवण्यासाठी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जिल्ह्यात येत आहेत. नेहमीप्रमाणे शासकीय शिष्टाचार आटोपून पालकमंत्री मुंबईला निघून जातील, परंतु त्यांनी पाठ फिरवल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील चिमुरड्यांना ज्या नरकयातनांचा सामना करावा लागतो, त्याकडे त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक अवस्था, एसटी बसेसचा तुटवडा आणि अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरवस्था यांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले असून, पालकमंत्र्यांना खडबडून जागे करण्यासाठी युवासेना जिल्हा समन्वयक ॲड. संजय भोरे यांच्या वतीने हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात येत आहे.
१. पालकमंत्र्यांच्या कुटुंबात देशातील पहिली ‘टेस्ला’; धाराशिवच्या विद्यार्थ्यांच्या नशिबी मात्र चिखलातून पायपीट! “परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या कुटुंबातील नातवाच्या सुखकर प्रवासासाठी देशातील पहिली, कोट्यवधी रुपयांची आलिशान ‘टेस्ला’ कार खरेदी केल्याची बाब समोर आली होती. आपल्या घरातील पुढच्या पिढीने अतिशय सुरक्षित आणि आरामदायी गाडीतून शाळा गाठावी म्हणून ही व्यवस्था मंत्री महोदयांनी केली. पण पालकमंत्री महोदय, ज्या धाराशिव जिल्ह्याचे तुम्ही पालक आहात, त्या जिल्ह्यातील सामान्य शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या मुलांनी शाळा-कॉलेज गाठण्यासाठी कोणत्या गाडीने प्रवास करावा?” असा रोखठोक सवाल ॲड. संजय भोरे यांनी केला आहे. परिवहन मंत्र्यांच्या कुटुंबात उच्च दर्जाच्या आलिशान गाड्या धावतात, पण त्यांच्याच जिल्ह्यात गरिबांच्या लेकरांना साध्या एसटी बससाठी तासनतास ताटकळत उभे राहावे लागते, ही अत्यंत संतापजनक बाब आहे.
२. रस्ते खराब असल्यामुळे अनेक ठिकाणी बस फेऱ्या बंद; विद्यार्थ्यांची ससेहोलपट! मुख्य रस्त्यांपासून गावांना जोडणारे अंतर्गत रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि दुरवस्थेत असल्यामुळे अनेक ग्रामीण भागांत एसटी बसच्या फेऱ्या पूर्णपणे बंद झाल्या आहेत. रस्त्यांची चाळण झाल्याने एसटी महामंडळाच्या गाड्या गावात जायला तयार नाहीत. परिणामी, ग्रामीण भागातील विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना चिखलातून आणि खड्ड्यांतून मैलोन्मैल पायपिट करत शाळा-महाविद्यालय गाठावे लागत आहे. स्वतःच्या घरातील मुलांच्या शाळेची काळजी घेणाऱ्या परिवहन मंत्र्यांना धाराशिवमधील हजारो विद्यार्थ्यांचा हा खडतर आणि अत्यंत धोकादायक प्रवास का दिसत नाही?
३. सत्तेच्या ऊबदार मखमलीवरून खाली उतरा; आधी आमच्या शाळा सुधारा! जिल्ह्यातील अनेक गावांमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची पदे वर्षानुवर्षे रिक्त आहेत. ‘व्हिजन २०३०’ च्या पोकळ गप्पा मारणारे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्हा परिषद प्रशासन एवढे निद्रिस्त आहे की, अलीकडेच परंडा तालुक्यातील सोनारी येथील चिमुरड्या विद्यार्थ्यांना आपल्या हक्काच्या शिक्षकासाठी तब्बल १०० किलोमीटरची प्रवास करून थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात शाळा भरवावी लागली. मीडियामध्ये नाचक्की झाल्यावर एका रात्रीत तात्पुरता शिक्षक देऊन महायुतीचे नेते आता स्वतःच्या डोक्यावर विजयाची खोटी टोपी चढवून श्रेय लाटण्याचा लाजिरवाणा प्रयत्न करत आहेत. परंतु, जिल्ह्यातील इतर शेकडो रिक्त पदांचे काय? याचे उत्तर पालकमंत्र्यांनी द्यावे.
४. ‘इव्हेंटबाजी’ बंद करा; मोडकळीस आलेल्या शाळा आणि घाणीचे साम्राज्य आधी साफ करा! केंद्रीय विद्यालयाचा डांगोरा पिटणारे आणि केंद्र सरकारच्या योजनांचे मोठे फलक लावून महायुतीत श्रेय लाटण्याची स्पर्धा करणारे नेते जमिनीवरील वास्तवापासून मैलोन्मैल दूर आहेत. आज धाराशिव जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांच्या इमारती अत्यंत जर्जर आणि मोडकळीस आल्या असून पाऊस पडला की वर्ग गळतात. ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र आणि स्वच्छ स्वच्छतागृहे नाहीत, आणि जिथे आहेत तिथे भयानक घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. अशा बिकट परिस्थितीत गोरगरीब, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मुलांनी शिक्षण कसे घ्यावे? असा संतप्त सवाल ॲड. भोरे यांनी उपस्थित केला आहे.
युवासेनेचा आक्रमक इशारा: पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय सोहळ्यात केवळ कोरडी भाषणे देऊन आणि विकासाचे कागदी आकडे दाखवून जनतेची दिशाभूल करू नये. त्यांनी केवळ ‘झेंडावंदन’ आणि ‘DPC’ पुरते मर्यादित न राहता, धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त शिक्षक भरती, बंद असलेल्या बस फेऱ्या पूर्ववत सुरू करणे आणि निकृष्ट रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत जागेवरच ठोस घोषणा करावी आणि कृती करून दाखवावी. पालकमंत्र्यांनी आणि प्रशासनाने या गंभीर प्रश्नांवर केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केल्यास, सोनारीच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेला आंदोलनाचा मार्ग उद्या संपूर्ण धाराशिव जिल्हा पेटवून उठवेल आणि युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या सुस्त शासनाविरोधात तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडेल, असा इशारा युवासेना जिल्हा समन्वयक ॲड. संजय भोरे यांनी दिला आहे.









