बारामतीत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; प्रियकराविरोधात गुन्हा दाखल, शरीरसंबंधासाठी दबावाचा आरोप
उपसंपादक गणेश महाडिक
बारामती शहरात एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून तिचा प्रियकर अथर्व राजेंद्र मेहन (वय 27, रा. बारामती) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 106(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी शिक्षण घेत होती आणि पुढील एमपीएससी परीक्षेची तयारी करत होती. तिचे अथर्व मेहन याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने त्यांच्या विवाहाबाबत निर्णय झाला होता.
मात्र, फिर्यादीत करण्यात आलेल्या आरोपानुसार, अथर्व हा तरुणीवर शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच तिला काही गोळ्या देण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
६ ऑगस्ट रोजी एमपीएससी परीक्षेसाठी ठरलेल्या वेळेनंतर तरुणीची प्रकृती बिघडल्याचे समोर आले. त्यानंतर तिच्यावर उपचार करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरुणीला कोणते औषध किंवा पदार्थ देण्यात आला होता का, तसेच त्याचा तिच्या मृत्यूशी काही संबंध आहे का, याबाबत वैद्यकीय व रासायनिक तपासणीनंतर अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करत असून संबंधित व्यक्तींचे जबाब, वैद्यकीय कागदपत्रे तसेच उपलब्ध इतर पुरावे तपासले जात आहेत.
दरम्यान, आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार असून, पोलिसांच्या तपासातून या तरुणीच्या मृत्यूमागील नेमके कारण आणि घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी समोर येण्याची अपेक्षा आहे.
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज २४ | उपसंपादक गणेश महाडिक








