आंबेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई!
३ गावठी अग्निशस्त्रांसह जिवंत काडतूस जप्त; तिघे आरोपी जेरबंद
उपसंपादक :-गणेश महाडिक
पुणे : आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी अग्निशस्त्र बाळगणाऱ्या तिघांवर पोलिसांनी धडक कारवाई करत ३ गावठी अग्निशस्त्रे आणि १ जिवंत काडतूस जप्त केले. या कारवाईत तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख २० हजार ४०० रुपये असल्याचे पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे सापळा
आंबेगाव पोलीस ठाण्यातील अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते, धनाजी धोत्रे, सचिन गाडे आणि सुभाष मोरे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जांभुळवाडी पाझर तलावाजवळील मोकळ्या जागेत, जांभुळवाडी रोड, शनिनगर, आंबेगाव खुर्द, पुणे येथे तीन इसम थांबले असून त्यांच्याकडे अग्निशस्त्रे आहेत.
मिळालेल्या माहितीची खातरजमा करून वरिष्ठांच्या आदेशानुसार महेश नायकवडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सापळा रचून तिन्ही संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी
राजन विनोद शहा, व्यवसाय – मजुरी, रा. टी. प्लॉट नं. ३०२, पोपळे क्रिस्टल सोसायटी, काळभैरवनाथ मंदिरासमोर, धायरीगाव, पुणे.
अनिल कैलास चौधरी, वय २६ वर्षे, व्यवसाय – पानटपरी, रा. फ्लॅट नं. १०१, संदेश रेसिडेन्सी, धायरीगाव, पुणे.
प्रथम अरुण रेणुसे, वय २४ वर्षे, व्यवसाय – गॅरेज, रा. फ्लॅट नं. ०२, जाधव हाईट्स, भैरवनाथ मंदिराच्या मागे, नाईक आळी, धायरीगाव, पुणे.
शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल
या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ३४८/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून, प्रेस नोटनुसार ते १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कस्टडी मंजूर झालेली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ मिलिंद मोहिते आणि सहायक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद हिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चांगदेव सजगणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश नायकवडी, पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे तसेच पोलीस अंमलदार चेतन गारे, हणमंत मासाळ, हरीश गायकवाड, निलेश जमदाडे, अवधूत जमदाडे, आकाश फासगे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसलें, नितीन कातुर्डे, सुभाष मोरे, अजय कामठे, ज्ञानेश्वर चित्ते, शिवाजी पाटोळे, योगेश जगदाळे, राकेश टेकवडे आणि फिरोज शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.
आंबेगाव पोलिसांच्या कारवाईने खळबळ
आंबेगाव परिसरात अग्निशस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे तातडीने कारवाई करत तीन गावठी अग्निशस्त्रे व जिवंत काडतूस जप्त करून तिघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. पुढील तपास आंबेगाव पोलीस करीत आहेत.








