वसमतचे उपनगराध्यक्ष इब्राहिम यांच्यावर गोवंश प्रकरणी गुन्हा; 19 गाईंची सुटका, तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण
हिंगोली |
उप संपादक श्रीहरी अंभोरे पाटील
हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष इब्राहिम यांच्याविरुद्ध गोवंश प्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसमत शहरालगत असलेल्या जवळा-खंदारबन परिसरात 19 गोवंश डांबून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी कारवाई करत अंदाजे ₹1 लाख 75 हजार किंमतीच्या 19 जनावरांची सुटका केली. ही जनावरे उपाशी अवस्थेत असल्याचेही सांगितले जात आहे.
या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा नोंद केला असून, ही जनावरे नेमकी कोणत्या उद्देशाने आणण्यात आली होती, याचा अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, शहरात ही जनावरे कत्तलीसाठी आणल्याची चर्चा सुरू असली, तरी याबाबत अधिकृतरीत्या पोलिसांकडून कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत या दाव्यांची अधिकृत खातरजमा झालेली नाही.
या प्रकरणातील आरोपी इब्राहिम हे वसमत विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजू भैया (चंद्रकांत) नवघरे यांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने या घटनेला राजकीय रंग चढला आहे. या घटनेनंतर तालुकाभर विविध चर्चांना उधाण आले असून पोलिसांच्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टीप: संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत कोणालाही दोषी ठरविण्यात आलेले नाही.








