आमदार एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला यश; नाशिक विभागातील औषध निरीक्षकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया वेगात
उप संपादक | प्रणित काठोके
जळगाव, धुळे व नंदुरबारमध्ये औषध निरीक्षक नसल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित; शासनाकडून भरती प्रक्रियेला गती देण्याची माहिती.
आमदार एकनाथराव खडसे यांनी नाशिक विभागातील औषध निरीक्षकांच्या रिक्त पदांचा गंभीर प्रश्न विधानसभेत उपस्थित करत शासनाकडे जाब विचारला होता. त्यास उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन विभागाने औषध निरीक्षकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली आहे.
आमदार खडसे यांनी नाशिक विभागात मंजूर २४ पदांपैकी केवळ २ पदांवरच औषध निरीक्षक कार्यरत असल्याने संपूर्ण विभागाचे कामकाज प्रभावित होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्यामुळे भेसळ रोखणे, औषध विक्रीची तपासणी आणि सर्वसामान्यांना दर्जेदार औषधे उपलब्ध करून देण्याच्या कामावर परिणाम होत असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.
शासनाच्या उत्तरानुसार, नाशिक विभागात औषध निरीक्षकांची २६ पदे मंजूर असून त्यापैकी केवळ २ पदे भरलेली असून २४ पदे रिक्त आहेत. जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक औषध निरीक्षक पद मंजूर असले तरी ती सर्व पदे सध्या रिक्त आहेत. या ठिकाणी सहाय्यक आयुक्तांकडून अतिरिक्त जबाबदारी सांभाळली जात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
याशिवाय अन्न व औषध प्रशासन विभागातील गट ‘अ’ आणि ‘ब’ संवर्गातील ७९४ मंजूर पदांपैकी २५९ पदे रिक्त असल्याची माहिती शासनाने दिली आहे.
शासनाने उत्तरात स्पष्ट केले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) औषध निरीक्षकांच्या १५४ पदांची भरती प्रक्रिया सुरू असून लेखी परीक्षा पूर्ण झाली आहे. पुढील मुलाखती व अंतिम निवडीनंतर नियुक्तीची कार्यवाही करण्यात येणार आहे.
आमदार एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नामुळे नाशिक विभागासह जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील औषध निरीक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, भरती प्रक्रिया लवकर पूर्ण होऊन नागरिकांना सक्षम औषध प्रशासन व्यवस्था मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








