शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण
प्रतिनिधी अशोक पाचुंदकर
आंबळे येथे भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन अल्पवयीन मुलांसह तीन जणांचा मृत्यू; अज्ञात वाहन व चालकाचा शोध घेण्यासाठी शिरूर पोलिसांची तीन तपास पथके रवाना
शिरूर : शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे आंबळे गावच्या हद्दीत न्हावरे ते शिरूर रोडवर केसरी हॉटेलसमोर अज्ञात वाहनाने पायी जाणाऱ्या चार जणांना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन अल्पवयीन मुलांसह तीन जणांचा मृत्यू झाला असून एक महिला जखमी झाली आहे.
सदर अपघात दिनांक 29/10/2026 रोजी रात्री सुमारे 11.00 वाजण्याच्या सुमारास घडला. आंबळे येथील रहिवासी ज्योती राजीव झेंडे (वय 42 वर्षे), कौशल्या वसंत झेंडे (वय 61 वर्षे), सोहम राजीव झेंडे (वय 13 वर्षे) व आरुषी दत्तात्रय झेंडे (वय 11 वर्षे) हे कीर्तन ऐकून पायी आपल्या घरी जात असताना न्हावरे बाजूकडून शिरूरच्या दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनावरील चालकाने वाहन हयगयीने व भरधाव वेगात चालवून त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.
या अपघातात कौशल्या वसंत झेंडे (वय 61 वर्षे), सोहम राजीव झेंडे (वय 13 वर्षे) व आरुषी दत्तात्रय झेंडे (वय 11 वर्षे) यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहनचालकाने जखमींना वैद्यकीय मदत न करता तसेच अपघाताची माहिती न देता घटनास्थळावरून पलायन केले.
याप्रकरणी फिर्यादी संतोष अनिल झेंडे (वय 36 वर्षे, रा. आंबळे, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 992/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमान्वये अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर अपघातातील अज्ञात वाहन व वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने तीन स्वतंत्र तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. सदर तपास पथकांमार्फत अपघातस्थळ परिसरातील तसेच न्हावरे ते शिरूर रस्त्यालगत असलेल्या विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात येत आहे. तसेच अपघाताच्या वेळी सदर मार्गावरून ये-जा केलेल्या वाहनांची माहिती संकलित करण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेज व उपलब्ध तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाची ओळख पटवून संबंधित आरोपी वाहनचालकाचा शोध घेण्याचे काम तीनही तपास पथकांमार्फत युद्धपातळीवर सुरू आहे.
दाखल अंमलदार : पोलीस हवालदार वाघमोडे (ब.नं. 2214)
तपास अधिकारी : पोलीस उपनिरीक्षक शेळके
शिरूर पोलीस स्टेशनकडून सदर अपघातातील वाहन व आरोपी चालकाचा शोध घेण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.
शिरूर पोलीस स्टेशन,
पुणे ग्रामीण.







