खेड तालुक्यातील ३१ कामांच्या जलजीवन मिशन योजनेच्या महावितरण कामांसाठी 2.71 कोटी रुपयांची मंजुरी;
आमदार बाबाजी काळे यांच्या प्रयत्नांना यश
प्रतिनिधी हंसराज पाटील
सर्व साधारण जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ अंतर्गत जलजीवन मिशनच्या महावितरण कामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून
भोरगिरी,गोसासी,गुळाणी,येणवे बु,कोहिनकरवाडी,नायफड(३ कामे),परसुल,साबुर्डी,शेलगाव,शेंदुर्ली,वेताळे,वडगाव तर्फे खेड,वाकळवाडी(२ कामे),वाळद,वाशेरे,येणवे बु,आखरवाडी,अनावळे,आसखेड बु,औंढे,गारगोटवाडी,गोरेगाव,कासारी,कोहिंडे खु,पाभे,वाफगाव,वाघु,वहागाव या
२८ गावांच्या पाणीपुरवठा योजनेच्या महावितरण कामांसाठी मंजुरी मिळाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.
विशेष म्हणजे, या विषयावर आमदार बाबाजी काळे यांनी मागील अधिवेशनात सातत्याने आवाज उठवत शासनाचे लक्ष वेधले होते. खेड तालुक्यातील अपूर्ण जलजीवन मिशन कामे, निधीची कमतरता आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्यांबाबत त्यांनी सभागृहात मुद्दा लावून धरला होता. तसेच मागील काळात पंचायत समिती येथे आढावा बैठक घेऊन माहिती घेतली होती तसेच याकामी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचे सहकार्य लाभले. आमदार बाबाजी काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.
दरम्यान, मंत्रालय मुंबई, येथे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत पुणे जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांबाबत अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले. तसेच अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
खेड तालुक्यातील ३१ कामांच्या योजनांना मंजुरी मिळाल्याने ग्रामीण भागातील हजारो नागरिकांना याचा थेट लाभ होणार असून, पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम आणि शाश्वत होण्यास मदत होणार आहे. या यशाबद्दल नागरिकांकडून आमदार बाबाजी काळे यांच्या प्रयत्नांचे स्वागत करण्यात येत आहे.








