हिंजवडीत आयटी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का! थिंक टेक्नॉलॉजी इंडिया कंपनीची अचानक टाळेबंदी; 700 हून अधिक कर्मचारी बेरोजगार
विशेष | प्रतिनिधी निलकंठ वसु पाटील
हातात नोकरीचे नियुक्तीपत्र आणि उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने घेऊन हिंजवडीत दाखल झालेल्या 700 हून अधिक तरुण-तरुणींना एका रात्रीत बेरोजगार व्हावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंजवडी फेज-2 येथील थिंक टेक्नॉलॉजी इंडिया या आयटी कंपनीने अचानक टाळेबंदी केल्याने शेकडो कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गेराज इम्पेरियम राईज इमारतीत कार्यरत असलेल्या कंपनीने गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणावर नोकरभरती केली होती. सुरुवातीला इंटर्न्सना वेळेवर मानधन देऊन विश्वास संपादन करण्यात आला. मात्र फेब्रुवारीपासून कर्मचाऱ्यांचे पगार रखडू लागले. याबाबत विचारणा केल्यावर कंपनीचे संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल ठाकरे आणि एचआर विभागाकडून “इंटरनल ऑडिट सुरू आहे” असे कारण देण्यात आले.
कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, थकीत वेतन अदा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांना धनादेश देण्यात आले, मात्र हे धनादेश बँकेत वटले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनीने अचानक टाळेबंदी केली. त्यामुळे सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, फ्रेशर्स आणि इंटर्न्स अशा 700 हून अधिक कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. अनेक कर्मचारी पुण्याबाहेरील असल्याने घरभाडे, कर्जाचे हप्ते आणि दैनंदिन खर्च भागविणे कठीण झाले आहे.
फोरम ऑफ आयटी एम्प्लॉईजचे सरचिटणीस प्रशांत पंडित यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. फ्रेशर्सकडून लॅपटॉप व नोकरीच्या नावाखाली पैसे घेऊनही पगार व ठेव रक्कम न दिल्याचे आरोप गंभीर असून कामगार विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
एका प्रभावित आयटी कर्मचाऱ्याने सांगितले की, “एचआर विभागाकडून मला 15 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. मात्र तो बँकेत जमा केल्यानंतर वटला नाही. कंपनीचा मालक गायब झाला असून चार महिन्यांपासून माझे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पोलिसांकडे तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.”
या संपूर्ण प्रकरणामुळे हिंजवडीतील आयटी क्षेत्रात खळबळ उडाली असून, पोलिस व कामगार विभाग या प्रकरणात कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








