विल्होळी येथील प्राणघातक हल्ल्यातील संशयीत दाम्पत्यास अटक
प्रतिनिधी : अतुल लोढा
दिनांक १३/०४/२०२६ रोजी सायंकाळचे सुमारास नाशिक तालुका पोलीस ठाणे हद्दीत विल्होळी गावचे शिवारात इसम नामे सुरजकुमार मोहनलाल सोलंकी (जैन), रा. अमरथाम रोड, नानावली, जुने नाशिक यास कोणीतरी अज्ञात महिला व पुरुषाने मोबाईल वर झालेल्या बोलाचालीच्या कारणावरून त्यांचे हातातील लोखंडी कोयत्याने व दगडाने सुरजकुमार सोलंकी याचे दोन्ही हातावर, मानेवर, डोक्याचे पाठीमागील बाजुस गंभीर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे म्हणुन नाशिक तालुका पोलीस ठाणेस गुरनं ७०/२०२६ भा.न्या.सं. कलम १०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा केल्यानंतर यातील संशयीत महिला व पुरुष यांनी अज्ञातस्थळी पलायन केले होते.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर यांनी तात्काळ दखल घेवुन पोलीस पथकांना आरोपीतांचे शोधासाठी मार्गदर्शन करून सुचना दिल्या. तसेच सदर घटनेच्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ विभाग श्री. वासुदेव देसले, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय शिंदे, नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक श्रीमती मृदूला नाईक यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून घडल्या परिस्थीतीची बारकाईने पाहणी केली, तसेच यातील जखमी इसम सुरज सोलंकी याचे दैनंदिन कामकाज, पुर्व इतिहास व सध्याचे वास्तव्याबाबत गोपनीयरित्या माहिती घेवुन तपासाची चक्रे फिरवली असता, त्याचे अलिकडील कालावधीत एका महिलेशी वाद असल्याचे निदर्शनास आले होते. त्याप्रमाणे तपास केला असता, यातील महिला व तिचा पती हे दोघेजण घटना घडल्यापासुन फरार असल्याचे समजले. त्यावरून त्यांचा शोध घेतला असता त्यांना नाशिक व अहिल्यानगर जिल्हयाचे सीमावर्ती भागातील एका खेडेगावातून ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेले आरोपी
१) हनुमंत आण्णासाहेब शिंदे, वय ४२, रा. अंधापुरी, ता. पाथरी, जि. परभणी, हल्ली विठाई नगर, नामको हॉस्पिटलच्या मागे, पेठरोड नाशिक
२) साधना हनुमंत शिंदे, वय ३७, रा. पैठण, जि. छत्रपती संभाजी नगर, हल्ली विठाई नगर, नामको हॉस्पिटलच्या मागे, पेठरोड नाशिक
यातील महिला आरोपी नामे साधना शिंदे हिचेकडे वरील गुन्हयाचे अनुषंगाने सखोल चौकशी केली असता, सदर घटनेतील जखमी सुरज सोलंकी व आरोपी साधना शिंदे यांची दोघांची वाडीव-हे येथील एका कंपनीत ओळख झाली होती. तेव्हापासून ते दोघे एकमेकांना ओळखत होते, कालांतराने सुरज सोलंकी हा साधना हिस ब्लॅकमेल करून, तिचेकडे अनैतिक संबंधाची मागणी करू लागला व तिस व तिचे परिवारास जिवे मारण्याची धमकी देत असल्याने, सदर गोष्टीचा राग मनात धरून साधना व तिचा पती हनुमंत शिंदे यांनी दोघांनी मिळून त्यास विल्होळी शिवारात बोलावुन, त्याचेशी झटापट करून त्याचे हातावर, मानेवर, डोक्याचे पाठीमागील बाजूस कोयत्याने व दगडाने गंभीर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीतांना वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून मा. न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक श्रीमती मृदूला नाईक यांचे पथक करीत आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ विभाग श्री. वासुदेव देसले यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय शिंदे, नाशिक तालुका पो.स्टे. च्या पोनि श्रीमती मृदूला नाईक, स्थागुशाचे सपोनि नितीन रणदिवे, पोउनि प्रकाश भालेराव, पोउनि शैलेश पाटील, सपोउनि नवनाथ सानप, पोहवा प्रविण काकड, संदिप नागपुरे, रावसाहेब कांबळे, हेमंत गिलबिले, धनंजय शिलावटे, प्रदिप बहिरम, संतोष दोंदे, किशोर बोडके, नितीन गांगुर्डे, मपोहवा ललिता शिरसाठ, अस्मिता मढवई, तसेच नाशिक तालुका पोस्टे चे पोहवा निलेश मराठे, शितल गायकवाड, अनिल मुरडनर, प्रकाश वाजे, मंगेश पानझडे यांचे पथकाने वरील गुन्हा उघडकीस आणुन कामगिरी केली आहे.
A








