बच्चू कडू यांना मोठा झटका, प्रहारच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश
प्रतिनिधी मुकुंद मोरे
काही दिवसांपूर्वीच प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर त्यांना शिंदे गटाकडून विधान परिषदेची आमदारकी देखील देण्यात आली. यामुळे नाराज झालेल्या प्रहारच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शुक्रवारी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार अंबादास दानवे, राहुल पाटील आणि खासदार नागेश अष्टीकर यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.
प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांना मोठा बसला आहे. बच्चू कडूंनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे नाराज झालेल्या सोलापूर, धाराशिव आणि परभणी जिल्हयातील शेकडो कार्यकर्त्यांनी शुक्रवारी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मातोश्रीवर हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी अंबादास दानवे, राहुल पाटील आणि खासदार नागेश अष्टीकर यांची देखील उपस्थिती होती.
दरम्यान यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडूंवर जोरदार कटाक्ष केला. ते म्हणाले कि बच्चू कडू यांना घरी बोलावून मंत्री बनवले ही माझीच चूक झाली. लोभापायी ते गेले पण कार्यकर्ते शिवसेनेसोबत आहेत. ठाकरे पुढे म्हणाले कि आपल्यातून गेलेला माणूस जुना शिवसैनिक होता. त्याला मोठं करण्याची जबाबदारी शिवसेनेने घेतली, पण काही लोक सत्तेच्या आणि पदाच्या मोहात अडकले. जे लोभासाठी गेले त्यांना जाऊ द्या.
बच्चू कडू यांनी राजकीय स्वार्थ साधला आहे, आम्ही त्यांच्या या निर्णयासोबत नाही. हा निर्णय घेताना त्यांनी कार्यकर्त्यांचा विचार केला नाही. स्वार्थासाठी कार्यकर्त्यांच्या भवितव्याचा बळी त्यांनी दिला आहे, असा आरोप काही दिवासांपूर्वी शिवलिंग बोधने यांनी केला होता.
बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी विधान परिषदेच्या आमदारकीच्या लोभाने शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. आम्हाला विकून बच्चू कडूंनी शिंदे गटात प्रवेश केला, आपल्याला फसवलं गेलं. आम्ही स्वाभिमानी असल्याने उद्धव ठाकरे यांच्यासोबत आलो आहोत, यापुढे नेहमी ठाकरेंच्या सोबत राहू, असं यावेळी कार्यकर्ते म्हणाले.








