पांडुरंग हरी, पांडुरंग हरी
विठुनामाच्या घोषात श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान
पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र देहू येथील जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात दर्शन घेतले. तसेच याच परिसरातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मंदिरात श्री गणेश पूजन, कलश पूजन, पाद्य पूजन करून पालखीची विधिवत प्रस्थान पूजा व आरती झाली. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील बळीराजा सुखी राहावा, सर्व नागरिकांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि महाराष्ट्राच्या यशाचा झेंडा उंच फडकत राहावा, अशी मनोभावे प्रार्थना केली.
टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात तल्लीन वारकरी… ‘ग्यानबा तुकाराम’, ‘माऊली, माऊली’चा गजर… डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी… अशा भक्तिमय वातावरणात देहू येथून आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. पंढरीच्या वारीसाठी मोठ्या संख्येने वारकरी देहू नगरीत दाखल झाले होते.
दर्शन व पूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित वारकरी माऊलींना वंदन केले. मंदिर संस्थानच्यावतीने याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संस्थानच्या विश्वस्तांशी चर्चा केली. महापुजेनंतर पालखीने इनामदार वाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खा. सुनेत्रा पवार, आ. सुनील शेळके, आ. विजय शिवतारे, आ. शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव महाराज मोरे, ह.भ.प दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे आदी उपस्थित होते.
