गाथा चिंतन’ मराठी साहित्य परिषदेची स्थापना
प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा
छ.संभाजीनगर (दि.०८/१२/२०२५)
आज संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून विवेकानंद महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे ‘गाथा चिंतन मराठी साहित्य परिषद,छ.संभाजीनगर’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. भंडारा,भामचंद्र बचाव तथा संतभूमी संघर्ष समितीचे प्रमुख ह.भ.प. मधुसूदन महाराज पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम विवेकानंद महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ दत्तात्रय डुंबरे यांनी आयोजित केला होता. त्यावेळी संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीचे औचित्य साधत ह.भ.प. मधुसूदन महाराज पाटील आणि डॉ दत्तात्रय डुंबरे यांच्या हस्ते गाथा चिंतन मराठी साहित्य परिषदेची स्थापना करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डाॅ.अरुणा पाटील, ह.भ.प. माधवी ताई माने, ह.भ.प .चैतन्य महाराज, हभप अजिनाथ महाराज गाडेकर, सचिन पाटील येरळीकर, प्रा.डाॅ. फुटाणे , प्रा डाॅ.परमेश्वर पुरी व गाथा चिंतन ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त ह.भ.प. डॉ. बालाजी महाराज जाधव हे उपस्थित होते. मराठी भाषेचे संवर्धन व संत साहित्याच्या प्रचार प्रसाराचे कार्य या परिषदेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले. लवकरच या परिषदेच्या माध्यमातून संत साहित्य संमेलन होणार असल्याचेही आयोजकांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.डाॅ.विठोबा मस्के यांनी केले तर आभार प्रा.चंद्रकांत तायडे यांनी मानले.









