अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
गडचिरोलीत आरक्षणाच्या सोडतीने रंगला राजकीय शह-मातचा खेळ! अनेक दिग्गजांची पंचाईत, काहींना सुरक्षित मतदारसंघाची लॉटरी
गडचिरोली प्रतिनिधी प्रमुख मनोज उराडे
गडचिरोली:- जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या गट व गणनिहाय आरक्षणाची प्रतीक्षेत असलेली सोडत आज अखेर नियोजन भवनात काढण्यात आली आणि त्यातून संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणात एकाच क्षणी शह-मातचा खेळ रंगला. महिलांसाठी तब्बल ५० टक्के जागा राखीव ठरल्याने अनेक दिग्गज नेत्यांची राजकीय समीकरणे पूर्णपणे उलटीपालटी झाली आहेत. ही सोडत उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल जाधव आणि नायब तहसीलदार हेमंत मोहरे यांच्या उपस्थितीत पार पडली. या सोडतीतून जिल्हा परिषदेच्या ५१ जागा आणि पंचायत समित्यांच्या १०२ जागांसाठी आरक्षण निश्चिात करण्यात आले.
आरक्षणानुसार गडचिरोली जिल्ह्याची नवी राजकीय रंगभूमी
कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि सिरोंचा या तालुक्यांतील गटांच्या आरक्षणात मोठे बदल झाले असून अनेक गटांमध्ये महिला, अनुसूचित जाती-जमाती आणि नामनिर्देशित प्रवर्गासाठी जागा राखीव ठरल्या आहेत. या बदलामुळे अनेकांना अपेक्षित मतदारसंघ ‘महिलां’च्या आरक्षणात गेल्याने धक्काच बसला आहे, तर काहींना अनपेक्षितपणे राजकीय संजीवनी मिळाली आहे.
“राजकीय समीकरणांची उलथापालथ”
या सोडतीनंतर जिल्हा परिषदेतील प्रमुख पक्षांचे अनेक नेते हवालदिल झाले आहेत.
काँग्रेसचे बंडोपंत मल्लेलवार, राष्ट्रवादीचे जगन्नाथ बोरकुटे, डॉ. तामदेव दुधबळे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेत्या भाग्यश्री आत्राम, काँग्रेसचे अजय कंकडालवार, भाजप नेत्या योगिता भांडेकर, भाजपचे प्रशांत वाघरे, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष राकेश बेलसरे यांना सुरक्षित मतदारसंघ मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत आहे.
मात्र काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष जीवन नाट, राष्ट्रवादी (अजित पवार गट) नेते नाना नाकाडे, शिवसेना शिंदे गटाचे सुरेंद्रसिंह चंदेल, भाजप नेते व माजी अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, माजी बांधकाम सभापती छाया कुंभारे यांची मात्र चांगलीच पंचाईत झाली आहे.
“कोण सुरक्षित, कोण संकटात?”
राष्ट्रवादी (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार आता सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात आहेत. तनुश्री आत्राम (अजित पवार गट) यांना त्यांच्या गृहतालुक्यातच सुरक्षित मतदारसंघ मिळाल्याने त्यांचे राजकीय पाऊल अधिक मजबूत झाले आहे.भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांना आता नव्या जागेचा शोध घ्यावा लागणार आहे. काँग्रेसचे युवा नेते प्रमोद भगत आणि बानय्या जनगाम यांचे मतदारसंघ कायम राहिल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
शिवसेना (ठाकरे गट) नेते अरविंद कात्रटवार यांना गडचिरोली तालुक्यात सुरक्षित जागा मिळाल्याने निवडणुकीत रंगत वाढणार आहे.
“राजकारणात नवा टर्निंग पॉइंट!”
महिलांसाठी ५० टक्के आरक्षण हा निर्णय प्रशासनाने घेतलेला असला तरी, या निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय नकाशा मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. अनुभवी नेत्यांना ‘असुरक्षित क्षेत्रात’ उतरावे लागेल, तर नव्या पिढीतील महिला नेतृत्वाला पुढे येण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.
राजकीय गोटांमध्ये सध्या एकच चर्चा – “कोणाचे तारे उंचावले आणि कोणाचे राजकीय भवितव्य धोक्यात आले?”
गडचिरोलीत हीच चर्चा आता प्रत्येक गावात, चौकात आणि चहाच्या टपरीवर रंगणार, यात शंका नाही!
श्री. मनोज उराडे
जिल्हा प्रतिनिधी – अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली








