ग्रामपंचायत गायगाव बाळापूरमध्ये 2.25 कोटींचा गैरवापर; सचिवावर गुन्हा दाखल करण्याची छावा संघटनेची मागणी
अकोट प्रतिनिधी निलकंठ वसु पाटील
ग्रामपंचायत गायगाव बाळापूर येथे सामान्य निधीतून सुमारे 2 कोटी 25 लाख रुपयांचा गैरवापर झाल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायत सचिवांवर करण्यात आला आहे. 15व्या वित्त आयोगाच्या निधीचा, डस्टबिन खरेदी, अंगणवाडी सामग्री खरेदी आणि दलित वस्ती विकास निधीच्या वापरात मोठ्या प्रमाणात अपहार करण्यात आला असून, खोटी बिले सादर करून गावातील सामान्य व भोळ्या जनतेची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची विनविलंब उच्चस्तरीय चौकशी करून, दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी अकोला जिल्हा छावा संघटनेचे अध्यक्ष व भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री. शंकराव वाकोडे यांनी केली आहे. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून हा प्रकार उघडकीस आणला.
गेल्या काही दिवसांपूर्वीच बाळापूर तहसीलमधील एका तलाठ्याला लाच घेताना पकडण्यात आले आहे. मात्र असे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत, हे दुर्दैवी आहे.
जर लवकरात लवकर या प्रकरणी कारवाई झाली नाही, तर जिल्हाभर छावा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी वाकोडे यांनी दिला.








