छत्रपती संभाजीनगर | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : आसाराम विरकर
छत्रपती संभाजीनगर शहरात बांगलादेशी हिंदु नागरिकांवर होत असलेल्या अन्याय व अत्याचारांविरोधात जागतिक मानव अधिकार दिनाचे औचित्य साधून सकल हिंदु समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये विविध हिंदुत्ववादी संघटना व धार्मिक पंथांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.
यावेळी सरला बेट धामचे महंत रामगिरी महाराज, महानुभाव पंथाचे महंत सुधीरदास महाराज, विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आणि बजरंग दलाचे पदाधिकारी यांनी या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली. भाजप आमदार अतुल सावे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, प्रदेश महामंत्री संजय केणेकर, जालिंदर शेंडगे, अमृता पालोदकर, साधना सुरडकर, व उज्ज्वला दहीफळे यांसह मोठ्या संख्येने सनातन हिंदुत्वाचे मानणारे नागरिक उपस्थित होते.
मोर्चादरम्यान उपस्थितांनी बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पाऊले उचलण्याची मागणी केली. या विषयाला संयुक्त राष्ट्र (युनो) संघटनेपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. आंदोलन शांततापूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.
यावेळी बोलताना हिंदु नेत्यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांचे तीव्र शब्दांत निषेध केला आणि सरकार व आंतरराष्ट्रीय संघटनांना या विषयावर ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले.
