*समाधान शिबिर अभियानातून समाजातील प्रत्येक घटकाला लाभ देण्याचे काम* आमदार बसवराज पाटील
उमरगा तालुका प्रतिनिधी :- शिवशरण बाबुराव पाटील
*उमरगा येथे महाराजस्व समाधान शिबिर अभियान*
* विविध योजनेच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटप
* अनेक विभागांचे माहिती स्टॉल
* महाआरोग्य शिबिराचा अनेकांनी घेतला लाभ
धाराशिव दि.२२ जुलै (जिमाका) शासनाच्या अनेक योजना आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या माध्यमातून प्रशासन गतिमान आली लोकाभिमुख करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.या अभियानाच्या माध्यमातून प्रशासन समाजातील प्रत्येक घटकाला लाभ देण्याचे काम करत आहे.असे प्रतिपादन आमदार बसवराज पाटील यांनी केले.
आज २२ जुलै रोजी उमरगा येथील आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणात उमरगा- लोहारा विधानसभा मतदारसंघस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान व महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार श्री.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन तथा मुरुम नगरपालिकेचे अध्यक्ष बापुराव पाटील,शरद पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष तथा महाआरोग्य शिबिराचे संयोजक श्री.शरण पाटील,उमरगा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे,लोहारा उपविभागीय अधिकारी सागर नन्नवरे,उमरगा तहसीलदार गोविंद येरमे,लोहारा तहसीलदार रणजीतसिंह कोळेकर,तसेच जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य व नगर पालिका सदस्यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती. आमदार श्री.स्वामी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून अनेक योजनांचा लाभ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष गावात देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी श्री.पुजार म्हणाले की,या शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे.शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी प्रशासनाकडून करण्यात येत आहे. महसूल विभागात क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले आहे. औद्योगिक व घरांसाठी आता अकृषक परवानगीची गरज नाही. निवासी अतिक्रमणे नियमाकुल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. लक्ष्मीमुक्ती योजनेत सातबारावर आता पतीसोबत पत्नीचे नाव घेण्यात येणार आहे.अँग्रीस्टॅकची नोंदणी करण्यात जिल्हा पुढे आहे. स्वामीत्व सनद,मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.या योजनेमुळे शेतकऱ्यांना बारमाही रस्ते मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.योजनेतील घरकुलाला वाळू उपलब्ध करून देण्यात येत आहे.यंत्रणा लाभ देण्यासाठी सज्ज असून नागरिकांनी योजनांचा लाभ घ्यावा.असे आवाहनही श्री.पुजार यांनी यावेळी केले.
या शिबिरात भूमी अभिलेख विभाग,महसूल विभाग,मुख्यमंत्री सहायता कक्ष,नाक कान घसा तपासणी,अस्थिरोग तपासणी, हृदयरोग,शल्य चिकित्सा,नेत्र विभाग,महसूल विभागाचा संजय गांधी निराधार योजना,पुरवठा विभाग,आधार प्रमाणीकरण, एस.टी.महामंडळ,पोलीस विभागाचा सायबर सेल व महिला सुरक्षा माहिती,सरकारी कामगार अधिकारी,पोस्ट विभाग,कृषी विभाग,समाज कल्याण विभाग, नगरपरिषद,पशुसंवर्धन,पंचायत विभाग,हरित धाराशिव सामाजिक वनीकरण विभाग,मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व औषध वितरण कक्ष असे विविध स्टॉल लावण्यात आले.विविध स्टॉलला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेटी देऊन योजनांची माहिती जाणून घेऊन संबंधित विभागांची माहिती पत्रके घेतली.
यावेळी मंचावरून मान्यवरांच्या हस्ते विविध योजनेच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्रे, धनादेश तसेच आवश्यक दस्तावेज वाटप करण्यात आले.प्रास्ताविक उमरगा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी केले.उपस्थितांचे आभार तहसीलदार गोविंद येरमे यांनी मानले.
नागरिकांनी महाआरोग्य शिबिरातून आपली आरोग्य तपासणी मोठ्या संख्येने करून घेतली.या महासमाधान शिबिराला उमरगा व लोहारा तालुक्यातील नागरिक व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








