नूतन प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये स्व अजित दादा पवार यांची जयंती साजरी…
उत्तर महाराष्ट्र विभागीय संपादक समाधान पाटील
अडावद ता चोपडा येथील नूतन प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शासन परिपत्रकानुसार दिनांक 22 जुलै 2026 रोजी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन ज्ञान मंदिर विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य आदरणीय बापूसो श्री पी डी चौधरी सर होते. व्यासपीठावर नूतन प्रायमरी इंग्लिश मीडियमच्या प्राचार्या सॅड्रा मॅडम, उपप्राचार्य श्री प्रकाश राणे सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व अजितदादांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पी डी चौधरी सर व सॅड्रा मॅडम हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रकाश राणे सर यांनी केले. अजितदादांची जयंती साजरी करण्यामागचा उद्देश त्यांनी सांगितला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पी डी चौधरी सर यांनी अजितदादांच्या जीवनाचा परिचय करून देताना विद्यार्थ्यांना अजितदादांचे स्वभाव वैशिष्ट्ये सांगून त्यांचा निर्भीड स्वभाव,स्पष्टवक्तेपणा, कामाची चिकाटी इत्यादी कार्यावर प्रकाशझोत टाकला. तसेच स्वर्गीय दादांनी महाराष्ट्राचे सर्वाधिक म्हणजे सहा वेळेस उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली.बारामती मतदारसंघात अनेक वेळेस आमदार म्हणून ते निवडून आले. उपमुख्यमंत्र्यांसोबतच अर्थ,नियोजन, पाटबंधारे खाते यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या,याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी नूतन प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.








