कफ परेड पोलिसांची मोठी कामगिरी; कार चोरी प्रकरणातील वॉन्टेड आरोपी गुजरातमधून अटकेत, चार गुन्ह्यांची उकल
मुंबई | प्रतिनिधी रणजीत मस्के
कफ परेड पोलीस ठाण्याच्या पथकाने मागील दहा महिन्यांपासून कार चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला गुजरातमधून शिताफीने अटक करत गुजरात, राजस्थान, दिल्ली आणि मुंबई येथील एकूण चार गुन्ह्यांची उकल केली आहे. पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विपुल जयराज कापडिया (वय ५१) यांनी त्यांची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर (क्रमांक MH-01-DE-7395) ही कार कफ परेड परिसरात पार्क करून ठेवली असता अज्ञात व्यक्तीने ती चोरी केल्याची तक्रार कफ परेड पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर यांच्याकडे सोपविण्यात आला. तपासादरम्यान आरोपी वारंवार मोबाईल क्रमांक आणि लोकेशन बदलत असल्याने त्याचा माग काढणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते. मात्र, पोलिसांनी हार न मानता गुजरातमध्ये सलग पाच दिवस तांत्रिक विश्लेषण, गुप्त बातमीदारांची माहिती आणि इतर सूत्रांच्या आधारे आरोपीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले.
दरम्यान, आरोपी अहमदाबाद (गुजरात) येथून रेल्वेने दिल्लीकडे पळून जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रेल्वेमधूनच आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विजय जयंती ठाकूर (वय ३१, रा. ठाकूर वास, अमोरढोल दरवाजा, वडनगर, जि. मेहसाणा, गुजरात) असे असून, त्याने गुजरात, दिल्ली आणि राजस्थान येथे देखील कार चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त, दक्षिण विभाग परिमंडळ-१, सहायक पोलीस आयुक्त कुलाबा विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गायकवाड आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या तपास पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर, पोलीस हवालदार फड, पाटील, खामकर तसेच पोलीस शिपाई काकडे, वाजे, जाधव आणि पाथरूड यांचा सहभाग होता. तांत्रिक मदत पोलीस हवालदार पाटील यांनी केली.
कफ परेड पोलिसांच्या या उल्लेखनीय कारवाईमुळे अनेक राज्यांतील वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्यास मदत झाली असून, वाहनचोरी करणाऱ्या गुन्हेगारांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.









