भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाकडून पतसंस्थेची स्थापना; २६ जुलै रोजी महत्त्वपूर्ण बैठक
नांदेड | प्रतिनिधी
समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या वतीने लवकरच पतसंस्थेची स्थापना करण्यात येणार असून, त्यासंदर्भातील नियोजनासाठी नुकतीच समन्वय समितीची महत्त्वपूर्ण बैठक नांदेड येथे पार पडली. या बैठकीत समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी पतसंस्था ही काळाची गरज असल्याचे मत उपस्थित पदाधिकारी व सदस्यांनी व्यक्त केले.
बैठकीत समाजातील विविध घटकांना आर्थिक मदत, बचतीची सवय वाढविणे, स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे तसेच गरजू कुटुंबांना आर्थिक आधार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पतसंस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमाच्या पुढील कार्यवाहीसाठी रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता गिरीराज मंगल कार्यालय, मोर चौकाजवळ, नांदेड येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
दि. १९ जुलै रोजी झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीस महासंघाचे अध्यक्ष बंडोपंत कुंटूरकर, उपाध्यक्ष सखाराम कुलकर्णी, सचिव प्रा. रमाकांत जोशी चिखलीकर, प्रा. गोविंदराव चौधरी, अभय कुलकर्णी, प्रसाद देशपांडे, रघुनाथ सरदेशपांडे, वेणुमाधव विनायक कुलकर्णी, धनंजय देशमुख राहेरकर, ॲड. प्रकाश जोशी (सगरोळी), कृष्ण उमरीकर, श्रीनिवास देशपांडे, श्रीमंत, ओंकार लव्हेकर, भीमराव श्रीमंत, सुचिता जोशी, शीला जोशी, ॲड. छाया कुलकजाईकर, राजश्री कृष्णा उमरीकर यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष बंडोपंत कुंटूरकर यांनी सांगितले की, “समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी पतसंस्था हा एक भक्कम आधार ठरणार असून, समाजातील प्रत्येक घटकाला तिचा लाभ मिळेल.” तर उपाध्यक्ष सखाराम कुलकर्णी यांनी महासंघाच्या आगामी उपक्रमांची माहिती देत सर्व समाजबांधवांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी व्यवस्था उभारण्याच्या दिशेने भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली.








