अनैतिक संबंधाच्या वादातून मजुराचा गळा आवळून खून; रावेर पोलिसांनी ३ दिवसांत उघड केला गुन्हा
उप संपादक | प्रणित काठोके
अनैतिक संबंधाच्या वादातून एका मजुराचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यात उघडकीस आली असून, रावेर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत तपासाची चक्रे वेगाने फिरवत या खुनाचा छडा लावला आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 343/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शेख सलमान शेख शब्बीर (वय 27, रा. उचंदा, ता. मुक्ताईनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश संजय घोरपडे (वय 27, रा. भोर, ता. रावेर) याचे मयताच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप आहे. एप्रिल 2026 मध्ये ऐनपूर येथे दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यावेळी आरोपीला मारहाण झाल्यामुळे त्याच्या मनात राग निर्माण झाला होता. त्यानंतर आरोपीने मयताला, “माझे तुझ्या पत्नीवर प्रेम आहे, तू मध्ये आला तर तुला ठार मारेन,” अशी धमकी दिल्याचे तपासात समोर आले आहे.
यानंतर मयताची पत्नी तिच्या माहेरी आशीरगड (जि. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) येथे गेली होती. दरम्यान, 9 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास आरोपी गणेश घोरपडे व त्याचा साथीदार मेघराज वसंत सांगळे (वय 29, रा. भोर, ता. रावेर) यांनी मयताला दारू पाजून मोटारसायकलवरून नांदूरखेडा शिवारात नेले. तेथे त्याचा हाताने गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मृतदेह शेतात टाकून आरोपी पसार झाले.
या प्रकरणाचा तपास करताना रावेर पोलिसांनी विविध तांत्रिक व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे गुन्ह्याचा उलगडा केला. आरोपी मेघराज सांगळे याला अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपी गणेश घोरपडे याला मध्य प्रदेश मधून अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, रावेर पोलीस ठाणे हे करीत आहेत.








