पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; बारामती, इंदापूर व यवत हद्दीत तीन आरोपी जेरबंद – चार गावठी पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे व १ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी अशोक पाचुंदकर
बारामती, दि. १० जुलै : पुणे ग्रामीण पोलीस दलाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध विशेष मोहीम राबवत बारामती, इंदापूर व यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत सलग कारवाया करून तीन आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चार गावठी पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे असा एकूण १ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी अवैध शस्त्रांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना देऊन मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ९ जुलै रोजी बारामती परिसरात कारवाई करून ओम उर्फ लाला राजेंद्र कुदांडे (वय २०, रा. भानगाव, ता. श्रीगोंदा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा ५० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर १० जुलै रोजी इंदापूर एस.टी. स्थानक परिसरात शाहरुख इस्माईल मुजावर (वय २५, रा. बावडा, ता. इंदापूर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुले व चार जिवंत काडतुसे असा ५० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
याच दिवशी यवत परिसरात सनी कुमार केशरी प्रसाद (वय २५, मूळ उत्तर प्रदेश) याच्याकडून एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध यवत पोलीस स्टेशनमध्ये शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी ही अवैध शस्त्रे कोठून आणली, ती कोणाला विक्रीसाठी किंवा कोणत्या गुन्ह्यासाठी वापरणार होते याचा पुढील तपास सुरू असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार (बारामती विभाग), उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम (बारामती विभाग) व उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस (दौंड विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास नाळे, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब कारंडे, तसेच पोलीस अंमलदार शिवाजी निकम, गुलाब पाटील, किशोर तेलंग, सचिन घाडगे, स्वप्नील अहिवळे, आसिफ शेख, शैलेश स्वामी, गणेश डेरे, सुलतान डांगे, रहीस मुलाणी, तुषार चव्हाण, गुरु गायकवाड, सुभाष राऊत, योगेश नागरगोजे आणि विकास कापरे यांनी सहभाग घेतला.
गेल्या तीन दिवसांत स्थानिक गुन्हे शाखेने बारामती उपविभागात केलेल्या विशेष मोहिमेत एकूण सात गावठी पिस्तुले व २१ जिवंत काडतुसे जप्त करून अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीला मोठा आळा बसणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.








