डीपी चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा शिरूर पोलिसांकडून पर्दाफाश; दोन आरोपी जेरबंद, १८ गुन्ह्यांची उकल
प्रतिनिधी अशोक पाचुंदकर
शिरूर, दि. ८ जुलै : शिरूर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने विद्युत रोहित्र (डीपी) फोडून त्यामधील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत आरोपींकडून १८ गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून सुमारे ३०० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा व एक मोटारसायकल असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ ते २ जानेवारी २०२६ दरम्यान आण्णापूर (ता. शिरूर) परिसरातील विद्युत रोहित्र फोडून त्यातील सुमारे १५० किलो तांब्याच्या तारांची चोरी करण्यात आली होती. याप्रकरणी गणेश राजेंद्र दिघे (रा. प्रीतमप्रकाश नगर, शिरूर) यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५/२०२६, भारतीय विद्युत कायदा कलम १३६ व भारतीय न्याय संहिता कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मागील काही महिन्यांपासून शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी डीपी चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. त्यामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित होऊन शेतकरी, ग्रामस्थ तसेच उद्योगधंद्यांचे मोठे नुकसान होत होते. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी तपास पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संतोष बारकू भालेराव (रा. जळुके बुद्रुक, ता. खेड) आणि किरण गोविंद खंडागळे (रा. जळुके बुद्रुक, ता. खेड) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टाकळी हाजी बीट परिसरात विविध ठिकाणी डीपी चोरीचे १८ गुन्हे केल्याची कबुली दिली.
या गुन्ह्यांमधील चोरीस गेलेल्या सुमारे ३०० किलो तांब्याच्या तारा आणि एक मोटारसायकल असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपींना न्यायालयाने १० जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार शरद वारे, अक्षय कळमकर, पोलीस अंमलदार विजय शिंदे, निखिल रावडे, नितेश थोरात, निरज पिसाळ, अंबादास थोरे, सचिन भोई, वैभव शेलार, रविंद्र काळे, दादाराव नागरे आणि अजय पाटील यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.








