आमदाबाद येथील दोन वीज ट्रान्सफॉर्मर फोडून तांब्याच्या तारांची चोरी; 80 हजारांचे नुकसान
प्रतिनिधी : अशोक पाचुंदकर | शिरूर
शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथील माशेरेमळा परिसरात अज्ञात चोरट्यांनी दोन वीज ट्रान्सफॉर्मर खाली पाडून त्यामधील तांब्याच्या तारांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारात महावितरणचे सुमारे 80 हजार रुपयांचे नुकसान झाले असून, शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 618/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 324(4) तसेच भारतीय विद्युत कायदा कलम 136 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी उत्तम वाल्मीक गाडेकर (वय 49), वरिष्ठ तंत्रज्ञ, महावितरण शाखा टाकळी हाजी यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 3 जुलै 2026 रोजी सायंकाळी 7 ते दि. 4 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या दरम्यान आमदाबाद येथील माशेरेमळा परिसरातील गट क्रमांक 81 मधील दोन 100/22 केव्हीए क्षमतेचे विद्युत ट्रान्सफॉर्मर अज्ञात चोरट्यांनी लोखंडी स्ट्रक्चरवरून खाली पाडले. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल सांडून त्याचे नुकसान केले आणि आत असलेल्या तांब्याच्या तारांची चोरी करून पोबारा केला.
चोरीस गेलेल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये ‘बी.आर. मोशेरे डीपी’ (डीटीसी कोड क्र. 4055112) आणि ‘बेलाचा मळा डीपी’ (डीटीसी कोड क्र. 0552295) या प्रत्येकी सुमारे 40 हजार रुपये किंमतीच्या ट्रान्सफॉर्मरचा समावेश असून, एकूण 80 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, गुन्ह्याची नोंद सहायक फौजदार साबळे यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार उबाळे (ब.क्र. 1898) करीत आहेत.








