लातूरमध्ये सकल जंगम समाजाचा गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
प्रतिनिधी : महालिंग स्वामी | लातूर
लातूर येथे सकल लातूर जिल्हा जंगम समाजाच्या वतीने इयत्ता 10 वी, 12 वी तसेच पदवी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास समाजबांधव, विद्यार्थी, पालक व मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली.
या सोहळ्यास श्री. ष. ब्र. 108 गुरु शंभुलिंग शिवाचार्य महाराज, मठ संस्थान अंबाजोगाई यांचे दिव्य सान्निध्य लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सकल लातूर जिल्हा जंगम समाजाचे अध्यक्ष शिवशंकर प्रभुवनिंग स्वामी होते.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय जंगम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रावण राजेंद्र जंगम (सातारा) उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून MPSC राज्य कर सहायक आयुक्त (वर्ग-1) शिवानंद शंकरराव तुपकरी (स्वामी) यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी करिअर, स्पर्धा परीक्षा आणि शिक्षणाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी सातत्य, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उच्च यश संपादन करावे, असे आवाहन केले.
यावेळी इयत्ता 10 वी, 12 वी व पदवी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपाध्यक्ष बसवेश्वर स्वामी कोकलगे घरणीकर, कार्याध्यक्ष निळकंठ शिवलिंग स्वामी हरंगुळकर, सचिव त्र्यंबक गुरुनाथ स्वामी, व्यासपीठ प्रमुख रामलिंग स्वामी किनगावकर व शरण आप्पा दावणगिरे, कोषाध्यक्ष ब्रह्मानंद स्वामी साकोळकर, सहसचिव अनिल गंगाधर स्वामी हरंगुळकर तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
याप्रसंगी ज्येष्ठ समाजबांधव बंडप्पा अण्णा काळगे, कुमारस्वामी गणाचार्य, सूर्यकांत अण्णा पत्रे, शरणाप्पा कलेमले, षण्मुखानंद स्वामी, शिवहार स्वामी, पंचाक्षरी स्वामी, शिवलिंग स्वामी मठपती, बसवराज चिट्टे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यातील जंगम समाजातील समाजबांधव, विद्यार्थी, पालक, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत कार्यक्रम यशस्वी केला.








