संपादकीय | अजिंक्य महाराष्ट्र न्युज महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त Tukaram Mundhe यांनी राज्यातील गुटखा, तंबाखू आणि प्रतिबंधित पानमसाल्याच्या अवैध व्यापाराविरोधात कठोर भूमिका घेत मोठा निर्णय जाहीर केला आहे. यापुढे गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या संघटित अवैध व्यापारात सहभागी असलेल्या टोळ्यांवर थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यात अनेक वर्षांपासून गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी असतानाही काही टोळ्या बेकायदेशीर मार्गाने उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्री करत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या अवैध व्यापारामागे मोठी आर्थिक साखळी कार्यरत असून त्याचा थेट परिणाम जनतेच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यांकडे केवळ नियमभंग म्हणून न पाहता संघटित गुन्हेगारी म्हणून पाहिले जाईल, असे मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.
FDA च्या माहितीनुसार, काही प्रकरणांमध्ये बनावट कागदपत्रे, बेनामी व्यवहार, गुप्त गोदामे आणि आंतरराज्य पुरवठा साखळ्यांचा वापर करून हा काळाबाजार चालवला जात आहे. त्यामुळे अशा प्रकरणांचा तपास पोलीस यंत्रणांच्या समन्वयाने करून मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कायद्याचे पालन करणाऱ्या व्यापाऱ्यांना कोणताही त्रास देण्याचा उद्देश नसून जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या माफियांवर कठोर कारवाई करण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, राज्यभर FDA कडून भेसळयुक्त अन्नपदार्थ, गुटखा आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांवर धडक कारवाया सुरू आहेत. अनेक ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला आहे. या मोहिमेमुळे अवैध व्यापार करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून सर्वसामान्य नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत होत आहे.
पत्रकार परिषदेदरम्यान त्यांना मिळालेल्या कथित धमक्यांबाबत विचारण्यात आले असता, “मला धमकी आलेली असं तुम्हाला कुणी सांगितलं?” असा प्रतिप्रश्न करत त्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे संकेत दिले.
राज्यातील सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी आणि भेसळखोर तसेच गुटखा माफियांचे कंबरडे मोडण्यासाठी FDA ची ही मोहीम पुढील काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जनतेच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.








