१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक; राज्यभर नोंदणी मोहिमेला वेग
मुंबई, दि. १२ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी सेवांमध्ये डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आणि प्रवाशांना अधिक पारदर्शक व सुलभ सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
या निर्णयानंतर राज्यभरात NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला असून, आजअखेर सुमारे ५१ लाख नागरिकांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी सुमारे २५ लाख कार्डे कार्यान्वित करण्यात आली असून, उर्वरित लाभार्थ्यांची कार्डेही लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे नोंदणी केलेल्या नागरिकांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यभरात ४ हजारांहून अधिक NCMC स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी ही केंद्रे कार्यरत असून वितरण प्रक्रियेला गती देण्यात आली आहे.
यासोबतच स्मार्ट कार्ड वितरणामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार सहन केला जाणार नसल्याचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. शासनाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारून कार्ड विक्री करणाऱ्या वितरण केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून, अशा केंद्रांचा परवाना तत्काळ रद्द करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ सुलभपणे मिळावा, तिकीट वितरण प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि एसटीची सेवा अधिक आधुनिक व डिजिटल व्हावी, या उद्देशाने NCMC स्मार्ट कार्ड प्रणाली लागू करण्यात येत आहे.
त्यामुळे संबंधित सर्व लाभार्थ्यांनी १ ऑगस्ट २०२६ पूर्वी आपले NCMC स्मार्ट कार्ड प्राप्त करून ते कार्यान्वित करावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
राज्य परिवहन व्यवस्थेच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात असून, आगामी काळात अधिकाधिक प्रवासी या स्मार्ट प्रणालीशी जोडले जाणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.









