वाढत्या NDPS गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा; PIT NDPS Act वर सखोल मार्गदर्शन
जळगाव उपसंपादक | प्रणित काठोके
अंमली पदार्थांच्या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच NDPS कायद्याच्या विविध तरतुदींबाबत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्ययावत माहिती मिळावी या उद्देशाने आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत केंद्रीय तपास पथकाकडून प्रशिक्षण घेतलेले एपीआय निलेश मोरे (धुळे जिल्हा) यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. NDPS कायद्यांतर्गत तपासाची प्रक्रिया, पुरावे संकलन, न्यायालयीन बाबी तसेच गुन्ह्यांच्या प्रभावी तपासासाठी आवश्यक असलेल्या विविध कायदेशीर तरतुदींबाबत त्यांनी विस्तृत सादरीकरण केले.
कार्यशाळेदरम्यान PIT NDPS Act (Prevention of Illicit Traffic in Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1988) या महत्त्वाच्या कायद्यावर विशेष भर देण्यात आला. अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यापाराला प्रतिबंध घालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या कायद्याच्या माध्यमातून संशयित व्यक्तींना भविष्यातील अवैध कृत्ये रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक नजरकैदेत ठेवण्याची तरतूद असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
तसेच हा कायदा शिक्षा देण्यासाठी नसून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली. केंद्र सरकार, राज्य सरकार अथवा त्यांच्याकडून अधिकृत अधिकाऱ्यांना नजरकैदेचे आदेश देण्याचे अधिकार असून, अशा व्यक्तींना ठरावीक परिस्थितीत कमाल तीन वर्षांपर्यंत प्रतिबंधात्मक ताब्यात ठेवता येते. याशिवाय नजरकैदेच्या आदेशांचे स्वतंत्र सल्लागार मंडळ (Advisory Board) मार्फत परीक्षण केले जाते, असेही सांगण्यात आले.
कार्यशाळेत NDPS Act, 1985 आणि PIT NDPS Act, 1988 यांमधील मूलभूत फरक स्पष्ट करण्यात आला. NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून न्यायालयीन प्रक्रियेद्वारे शिक्षा दिली जाते, तर PIT NDPS कायद्यांतर्गत संभाव्य गुन्हे रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक नजरकैद करण्यात येते, असे नमूद करण्यात आले.
यावेळी विविध न्यायालयीन निर्णयांचे दाखले देत तपासातील त्रुटी टाळणे, कायदेशीर बाबींचे काटेकोर पालन करणे आणि अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्रे अधिक भक्कम करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे अशा गुन्ह्यांतील आरोपींना न्यायालयातून सहज दिलासा मिळणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला.
या प्रशिक्षण कार्यशाळेला जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








