जळगाव पोलिसांची “ऑपरेशन ऑल आऊट” मोहीम; १,४४३ वाहतूक कारवाया, १९६ दारूबंदी गुन्हे, ३४ बेपत्ता महिला शोधल्या
जळगाव उप संपादक | प्रणित काठोके
जळगाव जिल्हा पोलिस दलाने दि. ५ जून रोजी जिल्हाभरात “ऑपरेशन ऑल आऊट” ही विशेष मोहीम राबवून विविध प्रकारच्या अवैध कृत्यांवर व्यापक कारवाई केली. या मोहिमेदरम्यान दारूबंदी, जुगार, अमली पदार्थ, वाहतूक नियमभंग, फरार आरोपी, अवैध वाळू वाहतूक यांसह विविध गुन्ह्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली.
पोलिसांनी दारूबंदी कायद्यांतर्गत १९६ गुन्हे दाखल करून ₹२१ लाख ६५ हजार ६७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांविरुद्ध ५६ गुन्हे नोंदविण्यात आले. तसेच जुगारविरोधी कारवाईत ७६ गुन्हे दाखल करून ₹४६ हजार ३९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शस्त्र अधिनियमांतर्गत ४ गुन्हे, तर अमली पदार्थ सेवन (NDPS) प्रकरणांत १० गुन्हे नोंदविण्यात आले. तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री व वापरासंदर्भातील COTPA कायद्यांतर्गत २०३ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान पोलिसांनी ३४ बेपत्ता महिलांचा शोध लावण्यात यश मिळवले, ही उल्लेखनीय बाब ठरली. तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८५ अंतर्गत २२ गुन्हे, कलम १२६ अंतर्गत २०१ बाँड, कलम १२९ अंतर्गत १७ बाँड, तर संशयास्पद वास्तव्याबाबत कलम १२२/१२४ अंतर्गत ५ गुन्हे दाखल करण्यात आले.
वाहतूक नियमभंगाविरोधातील कारवाईत १,४४३ वाहनचालकांवर कारवाई करून ₹९ लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या ३७ चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
तसेच मुंबई पोलीस अधिनियम कलम १४२ अंतर्गत ५ तडीपार आरोपींना पकडण्यात आले, तर ४२ अटक वॉरंट (NBW) आणि ५२ जामीनपात्र वॉरंट (BW) बजावण्यात आले. अवैध वाळू वाहतूक प्रकरणी ६ गुन्हे दाखल करण्यात आले असून २ फरार/वॉंटेड आरोपींना अटक करण्यात आली.
याशिवाय जिल्ह्यातील २०८ हॉटेल्सची तपासणी करून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. जळगाव पोलिसांच्या या व्यापक मोहिमेमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यास तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींवर आळा घालण्यास मदत होणार असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले.








