जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड, नागपुरातून तीन आरोपी जेरबंद
जळगाव उप संपादक | प्रणित काठोके
भुसावळ शहरातील घरफोडीचा गंभीर गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कारवाईत नागपूर शहरातून परराज्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे १६ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक ३१ मे २०२६ रोजी एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८६/२०२६ दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समांतर तपास करून गुन्हा तातडीने उघड करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार विविध पथके तयार करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच तांत्रिक विश्लेषण करण्यात आले.
तपासादरम्यान गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी नागपूर येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार नागपूर पोलिसांच्या मदतीने राजू जसपालसिंग (रा. हरियाणा), भोला उर्फ बिरेंद्र सुखदेव पासवान (रा. बिहार) आणि राजेश पारस शहा (रा. बिहार) या तिघांना ताब्यात घेण्यात आले.
सखोल चौकशीदरम्यान आरोपींनी घरफोडीची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १६.३४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल तसेच पोलीस कर्मचारी गोपाळ गव्हाणे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी आणि राहुल वानखेडे यांचा समावेश होता.








