पुण्यात पीएमटी चालकाचा बेजबाबदारपणा! रस्त्यावरच बस लावून झोप; मेन बिल्डिंगसमोर तासन्तास ट्रॅफिक जाम
उपसंपादक – श्री. गणेश महाडिक
पुणे – शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच आज दिनांक १७/०४/२०२६ धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे महानगरपालिका मेन बिल्डिंग समोरील मुख्य रस्त्यावर पीएमटी बस चालकाने बेजबाबदारपणे बस उभी करून थेट झोप घेतल्याने मोठा ट्रॅफिक जाम निर्माण झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपार च्या वेळेत पीएमटीची बस रस्त्यात उभी करण्यात आली. चालकाने कोणतीही पूर्वसूचना किंवा सुरक्षा उपाय न करता गाडीतच झोप घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
या घटनेमुळे कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी तसेच आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण झाला. काही वाहनचालकांनी संताप व्यक्त करत संबंधित चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, वाहतूक पोलिसांकडून मात्र, दुर्लक्ष होत असून अशाच प्रकारच्या निष्काळजीपणामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांमधून अशी मागणी होत आहे की, पीएमटी प्रशासनाने चालकांच्या शिस्तीबाबत कठोर नियम लागू करून अशा घटनांना आळा घालावा.









