महिला आरक्षण विधेयक पडल्यावर दिल्लीत तणाव; रक्षा खडसे आणि बांसुरी स्वराज पोलिसांच्या ताब्यात
प्रतिनिधी | प्रणित काठोके
दिल्लीतून एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि भाजप खासदार बांसुरी स्वराज यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. संसदेच्या परिसरात झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.
लोकसभेत महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक मांडण्यात आले होते. मात्र आवश्यक बहुमत न मिळाल्यामुळे हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. यानंतर भाजपच्या महिला खासदारांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संसदेच्या आवारातच घोषणाबाजी सुरू केली. विरोधकांवर विधेयक अडवण्याचा आरोप करत काही खासदारांनी ठिय्या आंदोलनही केल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, संसदेच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या निदर्शनांवर नियमांनुसार बंदी आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्याचे लक्षात येताच आणि सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून दिल्ली पोलिसांनी हस्तक्षेप केला. शनिवारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत असताना रक्षा खडसे आणि बांसुरी स्वराज यांना ताब्यात घेण्यात आले.








