यवतमाळ जिल्ह्यात उद्योग व रोजगाराला नवी दिशा; रिना धनरे यांची शिव उद्योग संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती.
घाटंजी / प्रतिनिधी :-
सामाजिक व औद्योगिक क्षेत्रामध्ये युवक आणि महिलांना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या शिव उद्योग संघटना यांच्या वतीने घाटंजी येथील रिना विजयकुमार धनरे यांची यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष दीपक विठल काळीद यांनी दिनांक २१ मे २०२६ रोजी अधिकृत नियुक्तीपत्र देऊन ही घोषणा केली.
या नियुक्तीनंतर रिना धनरे यांच्याकडे यवतमाळ जिल्ह्यातील वणी-मोरगाव, घाटंजी, पांढरकवडा तसेच कळंब या महत्त्वाच्या भागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संघटनेच्या माध्यमातून स्थानिक युवक, महिला बचत गट, लघुउद्योजक आणि बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, शासनाच्या विविध रोजगार व उद्योग योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविणे आणि नवउद्योजकांना मार्गदर्शन करणे, अशी महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
रिना धनरे या सामाजिक कार्यात सक्रिय असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रमांमध्ये त्यांनी सातत्याने सहभाग नोंदविला आहे. ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गट, लघुउद्योग, घरगुती व्यवसाय तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण यांसारख्या उपक्रमांवर त्या विशेष भर देत असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
संघटनेचे अध्यक्ष दीपक काळीद यांनी सांगितले की, “आजच्या काळात युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. उद्योग, व्यवसाय आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होणे आवश्यक आहे. रिना धनरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जाईल, असा आम्हाला विश्वास आहे.”
दरम्यान, या नियुक्तीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राला नवी दिशा मिळणार असून ग्रामीण भागातील युवक आणि महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक स्तरावर लघुउद्योगांना चालना मिळाल्यास आर्थिक विकासासोबतच स्थलांतराचे प्रमाण कमी होण्यासही मदत होईल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
रिना धनरे यांनी नियुक्तीबद्दल संघटनेचे आभार मानत, “संघटनेने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून युवक व महिलांना उद्योग आणि रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार,” अशी प्रतिक्रिया दिली.








