पुणे ग्रामीण पोलिसांची आंतरराज्यीय गांजा तस्करांवर धडक कारवाई; ६३४ किलो गांजा जप्त, सात आरोपी
जेरबंद — तब्बल ३ कोटींचा मुद्देमाल हस्तगत
उपसंपादक :-गणेश महाडिक
पुणे : नशामुक्त भारत अभियानांतर्गत पुणे ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी धडक कारवाई करत आंतरराज्यीय गांजा तस्करी करणाऱ्या टोळीतील सात आरोपींना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तब्बल ६३४ किलो गांजा, दोन इनोव्हा कारसह सुमारे ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियानाला गती देत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार बारामती शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७८/२०२६ एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी जळोची-पिंपळी रोड परिसरातील भारत कांबळे यांच्या शेतात दोन प्लास्टिक ड्रममध्ये सुमारे ४७८.९५० किलो गांजा साठवून ठेवलेला आढळून आला होता. या गांजाची किंमत तब्बल २ कोटी ३९ लाख ४७ हजार ५०० रुपये इतकी होती. अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांची विशेष पथके नियुक्त करण्यात आली होती.
तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे समाधान धर्मराज गायकवाड आणि विकी ऊर्फ पप्पू कांबळे यांनी साथीदारांच्या मदतीने हा गांजा छत्तीसगडमधून आणून साठवून ठेवल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे प्रकाश ऊर्फ पक्या काटे, समाधान गायकवाड, प्रिन्सकुमार मुन्ना सिंग आणि राहुल गोरे यांना तांदुळवाडी परिसरातून अटक केली. चौकशीत आरोपींनी विकी कांबळे, संग्राम ऊर्फ चंदन सिंग आणि जॉकी माझी यांच्या मदतीने गांजा आणल्याची कबुली दिली.
यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू ठेवला. दरम्यान आरोपी दोन इनोव्हा कारमधून छत्तीसगडहून बारामतीकडे येत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती पोलिसांनी पाठलाग सुरू केला. एक वाहन तासगावच्या दिशेने गेल्यानंतर सांगली स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेण्यात आली.
दि. २० मे २०२६ रोजी सांगली एमआयडीसी कुपवाड पोलिसांनी एमएच ०२ सीझेड ०३०२ या इनोव्हा कारला ताब्यात घेतले. वाहनातून १३४ किलो गांजा, किंमत ३३ लाख ५५ हजार रुपये, जप्त करण्यात आला. यावेळी विकी ऊर्फ पप्पू विजय कांबळे याला अटक करण्यात आली.
तर दुसऱ्या कारवाईत पुणे ग्रामीण पोलिसांनी दि. २१ मे रोजी फल गवारे चौक, बारामती येथे एमएच ०२ ईई ४९४९ या इनोव्हा कारवर छापा टाकून २३ किलो गांजा जप्त केला. या प्रकरणात हुसेन, आदित्य शिंदे आणि युवराज दुर्गे या तिघांना अटक करण्यात आली.
या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी एकूण ६३४ किलो गांजा, दोन इनोव्हा कार आणि इतर साहित्य असा सुमारे ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी छत्तीसगडमधून गांजा खरेदी करून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणत असल्याचा तपासात उलगडा झाला असून या टोळीचे आणखी धागेदोरे शोधण्याचे काम सुरू आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करीच्या जाळ्याला मोठा धक्का बसला असून जिल्ह्यातील गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे.








