घोडसगाव-चिखली शिवारात बिबट्याचा धुमाकूळ; महिन्याभरात पशूंवर चार हल्ले
(प्रतिनिधी) प्रणित काठोके
मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव व चिखली शिवार परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील महिनाभरात पशुधनावर चार हल्ल्यांची नोंद झाली असून, अनेक जनावरे ठार तर काही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
शिवारातील शेतांलगत वसलेल्या गोठ्यांजवळ बिबट्याची वारंवार वर्दळ दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी जनावरांवर हल्ले होत असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. काही ठिकाणी बिबट्याचे ठसेही आढळून आले असून, वनविभागाने याकडे लक्ष दिले पाहिजे
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, महिन्याभरात चार वेगवेगळ्या घटनांमध्ये गायी, वासरे आणि शेळ्यांवर हल्ले झाले आहेत. त्यामुळे आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे.
दरम्यान, बिबट्याचा बंदोबस्त करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत असून प्रशासनाकडून पुढील उपाययोजनांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








