पुणे जिल्ह्यात
रॅपिडो कंपनीविरोधात गुन्हा दाखल; नागरिकांना बेकायदेशीर बाइक टॅक्सी सेवा न वापरण्याचे आवाहन
महालिंग स्वामी पुणे | प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यात रॅपिडो (Rapido) कंपनीकडून परवान्याशिवाय बाइक टॅक्सी सेवा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. रॅपिडो कंपनीकडे बाइक टॅक्सी चालविण्यासाठी आवश्यक एग्रीगेटर परवाना नसल्याने नागरिकांनी या सेवेचा वापर करू नये, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेल्या वृत्तनिवेदनानुसार, पुणे जिल्ह्यात परवान्याशिवाय बाइक टॅक्सी सेवा सुरू असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींना याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही सेवा सुरू असल्याने कंपनीविरोधात **२६ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे** निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकारी, एग्रीगेटर कंपनीचे प्रतिनिधी आणि ऑटो रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत परवान्याशिवाय बाइक टॅक्सी व्यवसाय सुरू ठेवू नये, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.
**नागरिकांना महत्त्वाचे आवाहन**
नागरिकांनी परवानगी नसलेल्या बाइक टॅक्सी ॲपचा वापर करू नये. तसेच दुचाकी वाहनमालकांनी आपल्या वाहनाची रॅपिडो बाइक टॅक्सी ॲपवर अनधिकृत नोंदणी करू नये. अशा प्रकारे वाहनाचा व्यावसायिक वापर होत असल्यास संबंधित नियमांनुसार कारवाई होऊ शकते, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
या वृत्तनिवेदनाची पुणे जिल्ह्यातील सर्व वर्तमानपत्रांमधून विनामूल्य व व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी, अशी विनंतीही प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केली आहे







