**
दहीहंडा पोलीस स्टेशन प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात अव्वल;
सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. गोपाल ढोले यांच्या कार्याची विशेष दखल**
अकोट प्रतिनिधी :
अकोट पोलीस उपविभागाअंतर्गत येणाऱ्या दहीहंडा पोलीस स्टेशनने प्रलंबित गुन्हे निकाली काढण्याच्या कामगिरीत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. डिसेंबर 2025 ते माहे (भाग 1 ते 5) या कालावधीत प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा प्रभावीपणे निपटारा करून दहीहंडा पोलीस स्टेशनने अकोट पोलीस उपविभागात अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
या उल्लेखनीय यशामागे काही महिन्यांपूर्वीच दहीहंडा पोलीस स्टेशनमध्ये रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. गोपाल ढोले यांचे नियोजनबद्ध नेतृत्व, कार्यक्षम तपासपद्धती व प्रशासकीय कौशल्य महत्त्वाचे ठरले आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रलंबित गुन्ह्यांचा सखोल आढावा घेत तपास प्रक्रियेला गती दिली.
गुन्ह्यांच्या तपासात वेळेचे काटेकोर नियोजन, पुराव्यांचे संकलन, साक्षीदारांचे जबाब, तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यात प्रभावी समन्वय साधून कामकाज करण्यात आले. परिणामी दीर्घकाळ प्रलंबित असलेली अनेक प्रकरणे यशस्वीरीत्या निकाली निघाली.
या उल्लेखनीय कामगिरीची अकोला जिल्ह्यातील अकोट उपविभाग स्तरावर विशेष दखल घेण्यात आली आहे. याअनुषंगाने सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. निखिल पाटील, अकोट उपविभाग यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. गोपाल ढोले यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत ही कामगिरी पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे द्योतक असल्याचे मत व्यक्त केले आहे.
प्रलंबित प्रकरणांचा निपटारा झाल्याने नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत विश्वास वाढला असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास मोठा हातभार लागला आहे. दहीहंडा पोलीस स्टेशनची ही कामगिरी इतर पोलीस ठाण्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.








