अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र तात्काळ वितरित करा – आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी
वेतनश्रेणी प्रस्ताव दाखल करण्यासंदर्भात शिक्षकांना निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्याबाबत आमदार लोणीकरांचे शिक्षण संचालकांना पत्र
प्रतिनिधी नामदेव मंडपे जालना
एकाच वेतन श्रेणीमध्ये सलग १२ वर्ष सेवा पूर्ण केलेल्या व्यक्तीला वरिष्ठ वेतन श्रेणी तर २४ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या व्यक्तीला निवड श्रेणी प्रशिक्षण दिले जाते. त्यानुसार दिनांक ३० एप्रिल २०२५ पर्यंत १२ व २४ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांचे निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण देण्यात आले. दि.२ जून २०२५ ते १२ जून २०२५ या दरम्यान ऑफलाइन पद्धतीने हे प्रशिक्षण पारही पडले. परंतु आतापर्यंत या प्रशिक्षणार्थींना त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळालेले नाही. हे प्रमाणपत्र तात्काळ वितरित करण्यात यावेत अशी मागणी माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांनी संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या प्रशिक्षणासाठी २ हजार रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आले होते. परंतु प्रशिक्षण पूर्ण करून ३ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असताना देखील अद्याप पर्यंत या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र मिळालेले नाहीत. त्यामुळे या सर्व शिक्षकांचे वेतन श्रेणी प्रस्ताव सादर करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. SCERT कडे वारंवार विचारणा करून देखील अद्याप पर्यंत कुठलीही माहिती मिळालेली नाही, अशा आशयाची निवेदने जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमधून प्राप्त झाले असल्याचे देखील आमदार बबनराव लोणीकर यांनी पत्रात म्हटले आहे.
सदर प्रशिक्षणादरम्यान संबंधित प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण पूर्ण करून स्वाध्याय व कृती संशोधनाचे गुण जुलै अखेरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने SCERT कडे पाठवणे अपेक्षित आहे त्यानुसार ते सर्व गुण पाठविण्यात आलेले आहेत. असे असताना या सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षकांना अद्याप पर्यंत प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या सर्व शिक्षक बांधवांना वेतन श्रेणी बदल करण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. असेही आमदार बबनराव लोणीकर यांनी पत्रात म्हटले आहे.
प्रशिक्षण पूर्ण करून देखील केवळ प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे वेतनश्रेणी बदल अडकवून ठेवला जात असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे सदरील सर्व प्रशिक्षणार्थींचे निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र तात्काळ वितरित करून वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रस्ताव दाखल करण्यामधील अडचणी दूर कराव्यात असेही आमदार बबनराव लोणीकर यांनी पत्रात म्हटले आहे.
