अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी – किशोर रमाकांत गुडेकर, मुंबई विभाग प्रतिनिधी प्रमुख
अभिमानास्पद जोगेश्वरीच्या शिरपेचात मानाचा तुरा १० थरांचा मनोरा रचून नवा विश्वविक्रम
जोगेश्वरी │ दहीहंडीची पंढरी म्हणून लौकिक असलेल्या जोगेश्वरीत पुन्हा एकदा सुवर्णअक्षरांनी लिहावा असा इतिहास घडला आहे. कोकण नगर गोविंदा पथक आणि जय जवान गोविंदा पथक यांनी जोगेश्वरी मातेच्या आशीर्वादाने आणि असंख्य प्रेक्षकांच्या जयघोषाच्या साक्षीने तब्बल १० थरांचा मानवी मनोरा उभारण्यात अभूतपूर्व यश संपादन केले.
या विश्वविक्रमामुळे जोगेश्वरीच्या शिरपेचात मानाचा नवा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण महाराष्ट्रभर आणि विशेषत: गोविंदा प्रेमी समाजात आनंदाचा प्रचंड जल्लोष साजरा होत आहे.
जयघोषांनी दुमदुमलेले वातावरण
विक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी परिसरात हजारोंच्या संख्येने नागरिक, महिला, लहानगे आणि ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती. *”गोविंदा आला रे आला!”*च्या घोषणांनी दणाणून गेले होते. प्रत्येक थर उभा राहताच उसळलेल्या टाळ्यांचा कडकडाट आणि जयजयकाराने वातावरण दुमदुमून गेले.
शिस्त, समन्वय आणि परंपरेचा संगम
या विक्रमी मनोऱ्यातील प्रत्येक थरामागे दिसून आली ती पथकांची वर्षानुवर्षांची मेहनत, कसून सराव आणि अद्वितीय समन्वय. गोविंदांचा आत्मविश्वास, शिस्त आणि चिकाटी याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दहीहंडी म्हटलं की जोगेश्वरीचे नेहमीच एक वेगळे स्थान राहिले आहे. याआधी अनेक थरांचे मानवी मनोरे घडवून जोगेश्वरीकरांनी परंपरेला नवा आयाम दिला आहे. पण आता १० थरांचा विक्रमी मनोरा घडवून आणल्याने जोगेश्वरीला खऱ्या अर्थाने दहीहंडीची राजधानी मानले जाऊ लागले आहे.
सामाजिक एकतेचा आदर्श
हा विक्रम केवळ शारीरिक क्षमतेचा नाही, तर एकतेचा, सहकार्याचा आणि परंपरेच्या जपणुकीचा आदर्श आहे. समाजातील सर्व घटकांच्या सहभागाने दहीहंडी हा उत्सव कसा सामाजिक ऐक्य, धैर्य आणि बंधुभाव अधोरेखित करतो याचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे.
अलीकडच्या यशाची परंपरा
अवघ्या काही दिवसांपूर्वी झालेल्या ‘प्रो गोविंदा’ स्पर्धेत जोगेश्वरीतील आर्यन्स गोविंदा (नागपूर निन्जास) पथकाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला होता. त्या यशानंतर लगेचच १० थरांचा जागतिक विक्रम घडवून जोगेश्वरीच्या गोविंदांनी आपला लौकिक पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.
