अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
जागतिक अवयवदान दिनानिमित्त ‘स्नेहबंध’ तर्फे जनजागृती गजू.
प्रतिनिधी -सारंग महाजन.
अहिल्यानगर – जागतिक अवयव दिनानिमित्त अवयवदानाचे महत्त्व आणि गरज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्नेहबंध फाऊंडेशनने एक विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात अवयवदान जनजागृतीपर फलकाचे अनावरण करण्यात आले. १३ ऑगस्ट हा जागतिक अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो. या वेळी पुणे पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, पुणे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्या हस्ते या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी स्नेहबंध फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे उपस्थित होते. सहआयुक्त शर्मा म्हणाले, अवयवदान हे एक महान दान आहे. यातून अनेक गरजू लोकांना जीवनदान मिळते.
यावेळी अपर पोलीस आयुक्त पाटील म्हणाले, अवयवदानामुळे एका व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याचे अवयव अनेक लोकांच्या उपयोगी पडू शकतात. सहकार आयुक्त कवडे म्हणाले, समाजातील प्रत्येक व्यक्तीने अवयवदानासारख्या सामाजिक कार्यामध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. अवयवदान हे समाजाला दिलेले एक मोठे योगदान आहे. त्यातून अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात.
एखाद्याचा मृत्यू अनेकांसाठी नवा जन्म ठरू शकतो
दरवर्षी १३ ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक अवयवदान दिन’ म्हणून साजरा केला जातो. यामागचा उद्देश केवळ अवयवदानाचे महत्त्व सांगणे नाही, तर समाजात जिवंत उदाहरणांद्वारे जागरूकता निर्माण करणे आहे. एखाद्याचा मृत्यू अनेकांसाठी नवा जन्म ठरू शकतो आणि हीच अवयवदानाची खरी ताकद आहे, असे डॉ. उद्धव शिंदे म्हणाले
