अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
औद्योगिक ग्राहकांसाठी महावितरणचा ‘स्वागत कक्ष’:
जलद सेवेचा नवा अध्याय
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
नागपूर, 23 जुलै 2025: औद्योगिक ग्राहकांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी आणि त्यांना जलद सेवा देण्यासाठी महावितरणने सुरु केलेला ‘स्वागत कक्ष’ आता औद्योगिक जगतासाठी वरदान ठरत आहे. नागपूर शहर आणि ग्रामीण मंडळासाठी कार्यान्वित झालेला हा विशेष कक्ष, औद्योगिक ग्राहकांना नवीन वीजजोडणीपासून ते बिलिंग आणि वीजपुरवठ्याच्या तक्रारींपर्यंतच्या सर्व समस्यांचे तत्पर निराकरण करीत आहे.
गेल्या दीड वर्षापासून कार्यान्वित असलेला हा ‘स्वागत कक्ष’ औद्योगिक ग्राहकांना आधीपासून उपलब्ध असलेल्या सर्व सेवांसोबत एक अतिरिक्त आणि अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा देत आहे. या कक्षाशी संपर्क साधताच, महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी थेट ग्राहकांच्या दारी पोहोचतात. तिथेच कागदपत्रांची पूर्तता करणे, ऑनलाइन अर्ज भरणे आणि आवश्यक शुल्क जमा करणे यांसारखी कामे जलद गतीने पूर्ण केली जातात. यामुळे औद्योगिक ग्राहकांचा वेळ आणि कष्ट दोन्ही वाचतात.
राज्याचे मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री, मा. देवेंद्र फडणवीस यांनी औद्योगिक ग्राहकांना दर्जेदार आणि तत्पर सेवा देण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार, महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी स्थानिक पातळीवर स्वतंत्र सेवा यंत्रणा उभारण्याची सूचना केली, ज्यातून या ‘स्वागत कक्षा’ची निर्मिती झाली.
‘स्वागत कक्षा’चे प्रमुख म्हणून कार्यकारी अभियंता (प्रशासन) कार्यरत आहेत. या कक्षाद्वारे नागपूर जिल्ह्यातील औद्योगिक ग्राहकांसाठी नवीन वीजजोडणीसाठी अर्ज आणि प्रक्रिया, वाढीव वीजभाराची मागणी, वीजपुरवठा खंडित होणे किंवा इतर तांत्रिक तक्रारी आणि बिलिंगसंबंधीच्या तक्रारी किंवा प्रश्न याबाबत मदत केल्या जाते.
महावितरणचे नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या अध्यक्षतेखाली ‘स्वागत कक्षा’च्या नियमित बैठका होतात. या बैठकांमध्ये औद्योगिक ग्राहकांशी थेट संवाद साधला जातो आणि त्यांच्या शंकांचे निरसन केले जाते. बुधवारी (दि. 23) नागपूर शहर मंडळाच्या स्वागत कक्षात आणि सोमवार (दि. 21) रोजी नागपूर ग्रामीण मंडळाच्या स्वागत कक्षाच्या बैठका पार पडल्या.
या बैठकीत 1 जुलै 2025 पासून लागू होणारे नवीन वीज दर, लोड फॅक्टर इन्सेंटिव्ह, वाढत्या वीज वापरावरील सवलत आणि एकूण वीज वापरावरील सवलत या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. याव्यतिरिक्त, पी.क्यू.एम. मीटर्सची आवश्यकता, त्यांची स्थापना आणि पॉवर फॅक्टर सुधारणा यावरही सविस्तर माहिती देण्यात आली.
नागपूर शहर मंडळालाच्या बैठकीला अधीक्षक अभियंता अमित परांजपे, कार्यकारी अभियंता राहुल जीवतोडे, समीर टेकाडे, स्वप्नील गोतमारे, धम्मदीप फुलझेले आणि संतोष क्षीरसागर यांच्यासह बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, महाराष्ट्र इंडस्ट्रियल असोसिएशन, विदर्भ इंडस्ट्रियल असोसिएशन, विदर्भ प्लास्टिक इंडस्ट्रियल असोसिएशन, वांजरा इंडस्ट्रियल असोसिएशन, विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल, लघु उद्योग भारती आणि इतर औद्योगिक संघटनांमधील सुमारे 30 प्रतिनिधी उपस्थित होते. तर नागपूर ग्रामीण मंडळाच्या बैठकीला अधीक्षक अभियंता संजय वाकडे, कार्यकारी अभियंता आणि कक्षाचे प्रमुख महेश चतुर्वेदी यांच्यासह इतर अभियंते आणि औद्योगिक ग्राहक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी, औद्योगिक संघटनांच्या विविध प्रतिनिधींनी नवीन वीज दर आणि पी.क्यू.एम. मीटर्स संदर्भात आपल्या शंका आणि चिंता व्यक्त केल्या. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या सर्व शंकांचे योग्य प्रकारे निरसन केले आणि ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. या बैठकीमुळे महावितरणला औद्योगिक ग्राहकांशी थेट संवाद साधण्याची आणि त्यांच्या समस्या अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी मिळाली.
महावितरणचा हा ‘स्वागत कक्ष’ औद्योगिक ग्राहकांसाठी एक महत्त्वाचे पाऊल असून, यामुळे उद्योगांना अखंडित वीजपुरवठा मिळण्यास आणि त्यांच्या समस्या जलद गतीने सुटण्यास मदत होत आहे. नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी औद्योगिक ग्राहकांनी या कक्षाचा वेळोवेळी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
फ़ोटो ओळ – स्वागत कक्षाच्या बैठकीला उपस्थित महावितरण अधिकारी आणि औद्योगिक ग्राहक प्रतिनिधी
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर
