10 लाखांच्या लाचेची मागणी,7 लाख घेताना महापालिका उपायुक्त जाळ्यात;ACB ने ठोकल्या बेड्या
संभाजी पुरीगोसावी ( सांगली जिल्हा ) प्रतिनिधी.
राज्यांत गेल्या काही महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडाडीची मोहीम हाती घेतली असून. लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांना दणका दिला जात आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये उपजिल्हाधिकाऱ्यास 5 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती. आता, लाच मागितल्या प्रकरणी सांगली (Sangli) महापालिकेचे उपायुक्तच लाच-लुचपतच्या जाळ्यात अडकले आहेत. तब्बल 7 लाख रुपयांची लाच (bribe) मागितल्याप्रकरणी उपायुक्त वैभव साबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिका क्षेत्रातल्या एका 24 मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी उपायुक्त साबळे यांनी 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. 10 लाखांची मागणी करून 7 लाख रुपयांच्या रक्कमेवर तडजोड झाली होती. याप्रकरणी तक्रारदाराने एसीबीला माहिती दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबंधित तक्रारदाराच्या सांगण्यावरुन सापळा रचला. त्यानुसार, तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे उपायुक्त महोदयांनी 7 लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झालं आहे. त्यावरुन, एसीबीने उपायुक्त वैभव साबळे विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, महापालिका उपायुक्त वैभव साबळे यांच्यावरील कारवाईनंतर महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी, एसीबी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.








