शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर वानाडोंगरी
प्रतिनिधी सतिष कडू नागपूर
नागपूर येथे मध्य भारतातील पहिली ‘टोटल एन्डोस्कोपिक माइट्रल व्हॉल्व रिप्लेसमेंट सर्जरी’ यशस्वीपणे पार पडली
मध्य भारतातील हृदयविकार उपचारांमध्ये एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नागपूर येथील वानाडोंगरी स्थित 1020 बेडेड शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर(एसएमएचआरसी) येथे दिनांक 21 मे 2025 रोजी मध्य भारतातील पहिली ‘टोटल एन्डोस्कोपिक माइट्रल व्हॉल्व रिप्लेसमेंट सर्जरी’ यशस्वीरित्या पार पडली. ही ऍडव्हान्स आणि मिनिमलि इन्व्हिसिव्ह शस्त्रक्रिया डॉ. सुम्बुल सिद्दिकी व त्यांच्या कार्डियोव्हॅस्क्युलर आणि थोरासिक सर्जरी (सीव्हीटीएस) टीमने पार पाडली, जी प्रदेशातील हृदयशस्त्रक्रिया कौशल्यांमधील एक महत्त्वपूर्ण यश आहे. संस्थेच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.
‘’ही केवळ तांत्रिकदृष्ट्या मिळालेल्या यशाची गोष्ट नाही – ही आमची बांधिलकी दर्शवणारी यशोगाथा आहे,” असे डीएमआयएचईआर(डीयू)चे ऑफ-कॅम्पस संचालक डॉ. अनुप मरार यांनी सांगितले. “एसएमएचआरसीमध्ये आम्ही फक्त प्रगत उपचार उपलब्ध करून देत नाही, तर ते सहज, परवडणारे आणि रुग्ण-केंद्रित असावेत यासाठी प्रयत्न करतो. या शस्त्रक्रियेस केवळ शस्त्रक्रिया कौशल्य नव्हे तर अनेक शाखांमधील समन्वय, तांत्रिक अचूकता आणि अमोघ मानवी करुणा यांची गरज होती आणि आमच्या टीमने सर्वच पातळ्यांवर उत्कृष्ट कामगिरी बजावली.”
‘’टोटल एन्डोस्कोपिक माइट्रल व्हॉल्व रिप्लेसमेंट सर्जरी ही एक अत्यंत स्पेशलाईझ आणि मिनिमलि इन्व्हिसिव्ह शस्त्रक्रिया आहे जी रोबोटिक तंत्रज्ञानाइतकी अचूकता देते, परंतु त्यासाठी सर्जनच्या हातातील कौशल्य, अनुभव आणि सर्जरी करताना डोळे आणि हातांचा अचूक समन्वय अत्यंत महत्त्वाचा असतो. छातीमध्ये मोठ्या चिरा न मारता ही प्रक्रिया रुग्णांना कमी वेदना, कमी जखमा आणि लवकर बरे होण्याचा मार्ग देते. ही केवळ एक शस्त्रक्रिया नव्हती; ही अनेक विभागांच्या एकत्रित कार्यक्षमतेची चुणूक होती, ज्याने हृदयविकार उपचारांमध्ये नवीन मापदंड निर्माण केला,” असे डॉ. मरार म्हणाले.
या प्रकरणाबद्दल सांगताना सीव्हीटीएस सर्जन इन्चार्ज डॉ. सुम्बुल सिद्दिकी म्हणालया, “आमच्याकडे आलेली उमरेड येथील 40 वर्षीय महिला रुग्ण होती आणि तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. हृदयाची धडधड जाणवत होती. तिला पूर्वी क्रोनिक रूमॅटिक हार्ट डिसीज होता, ती एट्रियल फिब्रिलेशनमध्ये होती आणि याआधी तिने बलून माइट्रल व्हाल्वोटॉमी करून घेतली होती.” इकोकार्डिओग्राम अहवालात तिला गंभीर माइट्रल स्टेनोसिस,माईल्ड ऑरटिक रिगर्जीटेशन, ग्लोबल लेफ्ट व्हेंट्रीक्युलर हायपोकाइनेशिया आणि कमी झालेला इजेक्शन फ्रॅक्शन आढळून आला – ज्यामुळे ती एक अति-जोखीम असलेली रुग्ण होती. तिला रुग्णालयात मेडिकल आयसीयूमध्ये दाखल केल्यानंतर, डॉ. हेमंत देशपांडे आणि त्यांची आयसीयू तसेच इंटेसिव्हिस्ट टीम, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अभय तिडके व डॉ. राहुल बडाई यांच्या मार्गदर्शनाखाली तिची प्रकृती स्थिर करण्यात आली. सर्व वैद्यकीय मूल्यांकन केल्यानंतर आम्ही त्यांना ‘टोटल एन्डोस्कोपिक माइट्रल व्हॉल्व रिप्लेसमेंट सर्जरी’ चा प्रगत आणि प्राण वाचविणारा उपचार पर्याय दिला. “छातीमध्ये कुठल्याही मोठ्या चिरा न मारता करण्यात येणाऱ्या या प्रक्रियेमुळे जखमा कमी होतात, रुग्ण लवकर रिकव्हर होतो आणि रुग्नालयातील भरती राहण्याचा कालावधी देखील कमी होतो. तिच्या कुटुंबाच्या पाठिंब्याने आणि तिचा धैर्यपूर्ण संमतीमुळे आम्ही ही मिनिमलि इन्व्हिसिव्ह पण जीव वाचवणारी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे एक यशोगाथा बनली,” असे डॉ. सिद्दिकी म्हणाल्या.
डॉ. सिद्दिकी यांनी सांगितले, “या शस्त्रक्रियेचे नेतृत्व करण्याचे भाग्य मला मिळाले, परंतु एक उत्कृष्ट टीमने माझी साथ दिली ज्यात जनरल सर्जन डॉ. अजय हरदास आणि डॉ. अविनाश रिणाईत, क्लिनिकल असिस्टंट डॉ. अवेस हसन, कार्डिएक अॅंनेस्थेटिस्ट डॉ. प्रसाद पानबुडे आणि नॉन-इनव्हेसिव्ह कार्डिऑलॉजिस्ट डॉ. गौरव वाघळे यांचा समावेश होता. हे यश शस्त्रक्रिया कौशल्य, सहकार्य आणि करुणेचे प्रतीक आहे. या सर्वांच्या तांत्रिक कौशल्यामुळे ही ऐतिहासिक शस्त्रक्रिया शक्य झाली.”
अॅंनेस्थेशिया विभाग प्रमुख डॉ. अंजली बोरकर यांनी सांगितले, “अशा अचूकतेवर आधारित, मिनिमलि इन्व्हिसिव्ह शस्त्रक्रियांमध्ये अॅिनेस्थेशिया देणे एक आव्हान आणि सन्मान दोन्ही आहे. आमच्या टीमने संपूर्ण प्रक्रिये दरम्यान रुग्णाच्या प्राणाचे योग्य पद्धतीने रक्षण केले.”
सर्जरी विभागप्रमुख डॉ. राजीव सोनारकर म्हणाले, “हे यश एसएमएचआरसी मधील विविध विभागांतील वाढती कौशल्ये आणि एकात्मिक समन्वय दाखवते. अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना पाठिंबा देणे हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.”
नर्सिंग संचालिका डॉ. सीमा सिंग यांनी सांगितले, “नर्सिंग स्टाफची भूमिका फार महत्त्वाची होती. सिस्टर प्रेरणा, ब्रदर गणेश, सिस्टर ख्रिस्तीना सॅम्युएल (परफ्युजनिस्ट), सिस्टर रागिणी, ब्रदर किशोर आणि ओटी टीम यांचे विशेष कौतुक आहे. शस्त्रक्रिया कालावधीतील सहकार्य आणि स्वच्छता यांची त्यांनी उत्कृष्ट काळजी घेतली. पोस्ट-ऑपरेटिव्ह काळजी ब्रदर आशीष, ब्रदर स्वप्नील, सिस्टर प्रगती, सिस्टर श्रुती आणि इतरांनी अत्यंत सजगतेने आणि सहानुभूतीने घेतली. मुख्य ओटी प्रभारी आणि बायोमेडिकल विभागप्रमुख श्री. अमरजीत बारसकर यांनी प्रत्येक उपकरण, स्कोप आणि मॉनिटर नीट कार्यरत राहावा याची खात्री केली.”
या यशाला आणखी महत्त्व प्राप्त झाले. कारण ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (एमजेपीजेएवाय) अंतर्गत पूर्णतः मोफत करण्यात आली, जे एसएमएचआरसीच्या “सर्वांसाठी प्रगत उपचार’’ या ध्येयास साजेसं आहे. एसएमएचआरसी चे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत गावंडे म्हणाले, “हे यशस्वी प्रकरण दाखवते की प्रगत आरोग्यसेवा ही फक्त पैसेवाल्यांसाठी असावी, असं नाही. एमजेपीजेएवाय अंतर्गत आम्ही हे सिद्ध केलं की अत्याधुनिक उपचार गरजूंना सुद्धा सहज उपलब्ध होऊ शकतात.”
डॉ. अनुप मरार म्हणाले, “या यशाने कार्डियाक सर्जरीचे भविष्य दाखवून दिले आहे जे केवळ ‘मिनिमलि इन्व्हिसिव्ह शस्त्रक्रिया नसून, ‘मॅक्झिमली इम्पॅक्टफुल’ उपचारांचा आदर्श आहे. जेव्हा कौशल्य, संघबांधणी, तंत्रज्ञान आणि सार्वजनिक सेवेशी असलेली बांधिलकी एकत्र येते, तेव्हा अशा गोष्टी शक्य होतात.”
या ऐतिहासिक कामगिरीने, श्री सागर मेघे यांच्या नेतृत्वाखाली आणि श्री दत्ताजी मेघे यांच्या दूरदृष्टीतून उभारलेल्या एसएमएचआरसीने पुन्हा एकदा सिद्ध केले की, ही संस्था अत्यंत क्लिष्ट, रुग्णस्नेही, परवडणारी आणि करुणेने भरलेली आरोग्यसेवा पुरवणारी अग्रगण्य संस्था आहे. या पत्रकार परिषदेस श्री अमित दास, डॉ. नुरूल अमीन आणि श्री संकेत सुरकर यांची उपस्थिती होती.
