मध्य रेल्वेने २०२५ चा जागतिक वारसा दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा केला, जो राष्ट्रासाठी त्यांच्या १७२ वर्षांच्या विशिष्ट सेवेचा प्रतिक आहे. दरवर्षी १८ एप्रिल रोजी साजरा केला जाणारा जागतिक वारसा दिन इंटरनॅशनल कौंसिल ओन मोनुमेंट्स एंड साइट्स (ICOMOS) सांस्कृतिक वारशाचे महत्त्व आणि त्याच्या जतनाची गरज याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी स्थापित केला होता. २०२५ ची संकल्पना, ICOMOS ने प्रस्तावित केल्याप्रमाणे, “वारसा जपण्याच्या संदर्भात आपतकालीन संरक्षण आणि संघर्ष प्रतिकारक वारसा कृती” आहे.
या निमित्ताने, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील प्लॅटफॉर्म १४ आणि १५ दरम्यान असलेल्या हेरिटेज अॅली येथे एक विशेष वारसा प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाने प्रवाशांचे आणि इतिहासप्रेमींचे लक्ष वेधून घेतले, ज्यात दुर्मिळ कलाकृती आणि भारतीय रेल्वेच्या गौरवशाली भूतकाळाची मनमोहक झलक दाखवण्यात आली.
युनेस्कोने नावाजलेले जागतिक वारसा स्थळ – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला बहुरंगी रोशनाईने सुंदरपणे प्रकाशित करण्यात आले होते. ब्रिटिश अभियंता फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स यांनी डिझाइन केलेले १३८ वर्षे जुने वास्तुशिल्प हे इंडो-गॉथिक वास्तुकलेचे एक अद्भुत उदाहरण आहे. त्याचे बांधकाम १८७८ मध्ये सुरू झाले आणि १८८८ मध्ये १६,१३,८६३ रुपये खर्चासह पूर्ण झाले. ही इमारत व्हिक्टोरियन गॉथिक पुनरुज्जीवन शैलीला मुघल आणि पारंपारिक भारतीय स्थापत्य घटकांसह एकत्र करते, जी भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वारशाचे प्रतीक आहे.
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात सीएसएमटी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
या उत्सवाचा एक भाग म्हणून श्री प्रतीक गोस्वामी अपर महाव्यवस्थापक आणि श्री सुबोध कुमार सागर प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता यांच्या नेतृत्वाखाली ‘हेरिटेज वॉक’ प्रधान विभाग प्रमुखांसह आयोजित करण्यात आला होता. या वॉकने सीएसएमटीच्या स्थापत्य वैभवावर प्रकाश टाकला आणि भारतीय रेल्वेचा समृद्ध वारसा साजरा केला. विविध सन्माननीय यात्री, नागरी संरक्षण, स्काउट्स आणि गाईड्स, स्वच्छता कर्मचारी आणि मोठ्या संख्येने रेल्वे कर्मचारी देखील या वॉकमध्ये सक्रियपणे सहभागी झाले होते.
याशिवाय, मुंबई अग्निशमन विभागाद्वारे अग्निसुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, विशेषतः वारसा वास्तू आणि कलाकृतींच्या संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अग्निशमन दलाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
मध्य रेल्वेने विविध ठिकाणी आपल्या वारशाचे जतन आणि प्रचार करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले आहेत:
• भारतातील सर्वात जुन्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेले भायखळा स्टेशन, १६ एप्रिल १८५३ रोजी बोरी बंदर ते ठाणे या पहिल्या ऐतिहासिक रेल्वे प्रवासाचा भाग होते. आता १७२ वर्षे जुने असलेले हे स्टेशन त्याच्या मूळ गॉथिक स्थापत्य वैभवात काळजीपूर्वक पुनर्संचयित करण्यात आले आहे आणि ते अत्यंत काळजीपूर्वक जतन केले जात आहे.
११८ वर्षे जुनी वारसा मार्ग असलेली नेरळ-माथेरान लाईट रेल्वे १९०७ मध्ये सुरू झाली. ही निसर्गरम्य नॅरो-गेज रेल्वे वयस्क, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंददायी अनुभव आहे. ती प्रवाशांना हिरव्यागार जंगलांमधून आणि डोंगराळ प्रदेशातून एक अनोख्या प्रवासाचा अनुभव देते व रेल्वे प्रवासाचा वारसा जपते.
भारतीय रेल्वेचा कालातीत वारसा जपण्यासाठी मध्य रेल्वे नेहमीच वचनबद्ध आहे आणि प्रगतीशील भविष्यासाठी आधुनिकीकरण आणि नवोपक्रम सातत्याने स्वीकारत आहे.
दिनांक: १८ एप्रिल २०२५
ही प्रेस रिलीज जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई यांनी जारी केली आहे.
