अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
माविमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यातील 192 पुरुष कार्यकर्त्यांना सन्मानपत्र
प्रतिनिधी सतीश कडू
नागपूर,दि. 24 : महिलांच्या प्रश्नांविषयी समाजातील सर्व घटकांमध्ये संवेदनशीलता अधिक वाढवून महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेत प्रत्येकाला सहभागी करून घेण्याचा नव-तेजस्विनी हा उपक्रम माविमने हाती घेतला आहे. या अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 8 तालुक्यांमधून महिलांच्या प्रश्नांवर दक्ष असणाऱ्या 192 पुरुषांना मेल जेंडर चॅम्पीयन अवार्ड देऊन माविमतर्फे सन्मानित केले जात असल्याची माहिती वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी ललिता दारोकर यांनी दिली.
नागपूर जिल्ह्यातील 8 तालुक्यांमध्ये नागपूर शहर व ग्रामीण, कुही, मौदा, काटोल, रामटेक, भिवापूर, हिंगणा तालुक्यांचा समावेश आहे. प्रत्येक तालुक्यातील 25 पुरुषांची निवड प्रक्रिया ही ग्रामपातळीवर समितीमार्फत करण्यात आली. या समितीने महिलांच्या प्रश्नांप्रती पुरुष कार्यकर्त्यांचे योगदान, त्यांनी घेतलेला पूढाकार व इतर निकष ठेवून ही निवड केल्याचे दारोकार यांनी स्पष्ट केले. आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी कुही व मौदा या तालुक्यातील निवड झालेल्या पुरुष कार्यकर्त्यांना विशेष कार्यक्रमात जेंडर चॅम्पीयन अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. मौदा येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारीन दुर्गे, गटविकास अधिकारी संजय डोंगरे यांच्या हस्ते तर कुही येथे नायब तहसीलदार बेले व माविमच्या ललिता दारोकर यांच्या हस्ते हे सन्मान देण्यात आले.
महिला आर्थिक विकास महामंडळाने नागपूर जिल्ह्यात नागपूर (ग्रा.), नागपूर (श.), मौदा, कुही, भिवापूर, हिंगणा, काटोल व रामटेक या आठ तालुक्यात महिलांचे लोक संचालित साधन केंद्र स्थापन करून ग्रामीण व शहरी भागात एकूण 4843 स्वयंसहाय्यता महिला बचत गट तयार केले आहेत. याद्वारे 56 हजार 950 महिलांचे संघटन व सक्षमीकरणाचे काम केलेले आहे. माविमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महिलांच्या आरोग्यासाठी सकस आहाराबाबत जनजागृती, आरोग्य तपासणी, तिरंगा थाळी स्पर्धा, स्त्री पुरुष संयुक्त मालकी अभियान, अॅनिमिया मुक्त गाव अभियान व गटातील महिलांनी उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
