जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | संतोष लांडे.
▪️आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण.
नागपूर,दि. 26 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा अनुभव गाठीशी घेऊन निवडणुक आयोगाच्या निर्देशांचे या वेळी अधिक जबाबदारीने पालन करुन योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे निवडणुकीसंदर्भात आज एक दिवसाचे प्रशिक्षण निवडणूक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या उद्घाटन सभारंभात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे, जिल्ह्यातील सर्व क्षेत्रीय अधिकारी, नोडल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
निवडणूक आयोगातर्फे निवडणुकीसंदर्भात विविध प्रकारच्या सूचना वेळोवेळी दिल्या जातात. या सूचना संदर्भात कोणाला शंका असल्यास त्या संदर्भातील समाधान हे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिल्या जाते. तंत्रज्ञानात होणारे बदल लक्षात घेता निवडणूक विभागातर्फे संकेतस्थळावर येणाऱ्या सूचना व त्याची अंमलबजावनी सर्वांनी दक्षतेने करावी, असे डॉ. इटनकर यांनी स्पष्ट केले. निवडणुकीच्या कामासंदर्भात कोणताही चुका या सहन केल्या जात नाहीत. जाणिवपूर्वक जर कोणी चुका केल्या तर अशा व्यक्तीविरुध्द कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
प्रशिक्षणाचे प्रास्ताविक उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे यांनी केले तर अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. तुषार ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले. एकूण पाच सत्रामध्ये हे प्रशिक्षण देण्यात आले. यात उप जिल्हाधिकारी शिवराज पडोळे यांनी उमेदवारी अर्ज पडताळणी, माघार, निवडणूक चिन्ह आदिबाबत मार्गदर्शन केले. भूसंपादन अधिकारी जे. पी. लोंढे, सहायक आयुक्त भूसंपादन शिल्पा सोनाले, उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत, वर्धा येथील अधीक्षक अनिकेत सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.