शिव छत्रपती निष्ठा प्रतिष्ठान परभणी यांच्या कडून परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन.
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज गोपाळ भालेराव
परभणी : परभणी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील मेडिकल,इंजिनिअरिंग व इतर व्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ/शासनामार्फत भरण्याबाबत जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन.देण्यात आले. परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात यावर्षी पावसाचे अत्यल्प प्रमाण, पावसातील अनियमितता आणि अपुऱ्या पर्जन्यमानामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. अनेक भागांमध्ये कोरड्या दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

शेतकऱ्यांनी पेरणीच्या वेळी बियाणे, खते, औषधे, मशागत, मजुरी तसेच इतर शेतीविषयक खर्चासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला आहे. मात्र पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर पुढील हंगामाची तयारी, कर्जफेड, घरखर्च आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह यांसारखे गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत.
या आर्थिक संकटाचा सर्वाधिक परिणाम शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची मुले-मुली मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, कृषी, पॉलिटेक्निक तसेच इतर व्यावसायिक व उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत आहेत. या अभ्यासक्रमांची वार्षिक फी, वसतिगृहाचा खर्च, पुस्तके, परीक्षा शुल्क, प्रवास व इतर शैक्षणिक खर्च शेतकऱ्यांना सध्याच्या परिस्थितीत झेपणे अत्यंत कठीण झाले आहे.

एका बाजूला शेतात केलेला खर्च वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, तर दुसऱ्या बाजूला मुलांच्या उच्च शिक्षणाची मोठी फी भरण्याचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे आहे. आर्थिक परिस्थितीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये, ही अत्यंत गंभीर बाब आहे.
शेतकयांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळणे हा केवळ एका कुटुंबाचा प्रश्न नसून ग्रामीण भागाच्या सामाजिक आधिक विकासाशी संबंधित विषय आहे. त्यामुळे सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना विशेष शैक्षणिक सवलत देणे अत्यंत आवश्यक आहे.परभणी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त/अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची मेडिकल, इंजिनिअरिंग व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांची शैक्षणिक फी माफ करण्यात यावी.ज्या विद्यार्थ्यांची फी पूर्णपणे माफ करणे शक्य नसेल, त्यांच्या शैक्षणिक शुल्काचा विशेष दुष्काळी पॅकेजअंतर्गत शासनामार्फत भार उचलण्यात यावा.
शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, फी-प्रतिपूर्ती व इतर शैक्षणिक योजनांचा लाभ तातडीने व सुलभ पद्धतीने मिळावा.
आजचा शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. त्याने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक अडचणी सहन करून त्यांना उच्च शिक्षणापर्यंत पोहोचवले आहे. मात्र दुष्काळामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटात त्यांना शिक्षणाची फी भरणे अशक्यप्राय होत आहे.
शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण पैशाअभावी थांबू नये, त्यांचे डॉक्टर, इंजिनिअर आणि उच्चशिक्षित होण्याचे स्वप्न अपूर्ण राहू नये, यासाठी शासनाने विशेष बाब म्हणून तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.
म्हणून परभणी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील मेडिकल, इंजिनिअरिंग व इतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फी माफ/शासनामार्फत भरण्याबाबत सकारात्मक व तातडीचा निर्णय घ्यावा, असे निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यासाठी शिव छत्रपती निष्ठा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष.श्री. संदीप गव्हाणे पाटील. सचिव. श्री. गोपाळ भालेराव.श्री. विजय चट्टे. अडव्होकेट. श्रीकांत मोगल.श्री. तेहरे महाराज.श्री. गुणाजी सुरवसे.श्री. मारोती इंगळे.श्री. भागवत दळवी.श्री.गजानन देशमुख. श्री. वसंतराव देशमुख.श्री. दिनकर गरुड.श्री. नागनाथ देशमुख. श्री. सोपान लोंढे.आदी मान्यवर उपस्थित होते







